वॉर्ड १७ मध्ये दीपमाला काळे यांची पाहणी; दंडात्मक कारवाईसह गटारी, नालेसफाई आणि प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
जळगाव समाचार | ३ नोव्हेंबर २०२६
शहरातील स्वच्छता, अतिक्रमण आणि नागरी सुविधांच्या प्रश्नांवर महापालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशा स्पष्ट सूचना देत महापौर दीपमाला काळे यांनी मंगळवारी (दि. ३) वॉर्ड क्रमांक १७ मध्ये पाहणी दौरा केला. ‘महापौर स्वच्छता संकल्प अभियानां’तर्गत झालेल्या या दौऱ्यात अनधिकृत गोठे, महापालिकेच्या जागेवरील अतिक्रमण आणि अस्वच्छतेच्या प्रकारांवर महापौरांनी आक्रमक भूमिका घेत संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच प्रलंबित नागरी समस्यांचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
या दौऱ्यात स्थानिक नगरसेवक इब्राहिम पटेल, अक्षय वंजारी, जरीना शब्बीर शाह, हीनाबी शाकीरखान, माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांच्यासह आरोग्य विभागप्रमुख समीर बोरोले, अभियंता विजय मराठे तसेच पाणीपुरवठा, विद्युत आणि आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मेहरूण परिसरातील साईबाबा मंदिराजवळ पाहणी करताना जुन्या मूत्रालयामुळे नागरिकांना त्रास होत असल्याची बाब निदर्शनास आली. हे मूत्रालय तातडीने हटवून संबंधित जागेवर नागरिकांच्या सुविधेसाठी बाकडे बसविण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. तसेच परिसरातील गटारींची स्वच्छता करण्याचेही निर्देश दिले.
एमआयडीसी रस्त्यावरील जुन्या बुरुजासमोर महापालिकेच्या जागेवर अनधिकृतपणे गाई-म्हशींचे गोठे उभारून व्यवसाय सुरू असल्याचे आढळले. या प्रकारावर महापौरांनी संबंधितांना जाब विचारत जागेवरील अस्वच्छतेबद्दल जागीच दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच अतिक्रमित जागा तातडीने मोकळी करून घेण्याचे आदेश दिले.
लक्ष्मीनगर परिसरातील गटारी आणि मोठ्या नाल्याच्या अस्वच्छतेचा प्रश्नही ऐरणीवर आला. यापूर्वी तक्रारी करूनही कार्यवाही झाली नसल्याबद्दल महापौरांनी नाराजी व्यक्त केली. नाल्याची तातडीने साफसफाई करून आवश्यक ठिकाणी कल्व्हर्ट उभारण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
दत्तनगर परिसरातील प्रलंबित गटारींची कामे पूर्ण करण्यासह ओव्हरफ्लो होणाऱ्या गटारींची तातडीने स्वच्छता करण्याचे निर्देशही संबंधित विभागाला देण्यात आले. केवळ पाहणी न करता प्रत्यक्ष कार्यवाही करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा या दौऱ्यातून व्यक्त करण्यात आली.

![]()







