जळगाव समाचार | २ नोव्हेंबर २०२६
जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी धडक कारवाई करत दोन अधिकाऱ्यांना दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. उपविभागीय अधिकारी (वर्ग-१) सतीश मनसुखलाल शिसोदे (वय ५५) आणि कनिष्ठ अभियंता (वर्ग-३) भागवत वसंत चवरे (वय ३२) अशी कारवाईतील आरोपींची नावे आहेत. कंत्राटदाराच्या रस्त्याच्या कामाचे बिल मंजूर करून देण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. या कारवाईमुळे जिल्हा परिषद प्रशासनात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४२ वर्षीय तक्रारदार हे शासकीय कंत्राटदार असून त्यांनी धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे सन २०२५-२६ अंतर्गत एक लाख ९० हजार ७६३ रुपयांचे सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे काम पूर्ण केले होते. या कामाची मोजमाप पुस्तिका (एमबी) तयार करून बिल काढण्यासाठी कनिष्ठ अभियंता भागवत चवरे यांनी यापूर्वीच २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. त्यानंतर बिल मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठविण्याच्या प्रक्रियेत उपविभागीय अधिकारी सतीश शिसोदे यांच्या नावाने एकूण बिलाच्या १.५ टक्के म्हणजे १५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने २ नोव्हेंबर रोजी जळगाव एसीबीकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या पडताळणीदरम्यान पंचांसमक्ष कनिष्ठ अभियंता चवरे यांनी बिलावर स्वाक्षरी करून मंजुरीसाठी पाठविण्याच्या मोबदल्यात १५ हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीनंतर दहा हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले. त्यानुसार एसीबीने जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालयात सापळा रचला. चवरे यांनी तक्रारदाराकडून दहा हजार रुपये स्वीकारून ही रक्कम उपविभागीय अधिकारी शिसोदे यांच्याकडे दिली. शिसोदे यांनी पैसे स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने दोघांना रंगेहात पकडले.
कारवाईदरम्यान शिसोदे यांच्याकडून ॲपल कंपनीचा मोबाईल आणि १९ हजार ६२० रुपये रोख, तर चवरे यांच्याकडून विवो कंपनीचा मोबाईल आणि २० हजार ६०० रुपये रोख जप्त करण्यात आले. जप्त केलेली रक्कम व मोबाईल पंचांसमक्ष ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमातील कलम ७ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांबडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक रेश्मा आवतारे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नंदुरबार, कॅम्प जळगाव) यांच्यासह पोलीस अंमलदार बाळू मराठे, मसोळेकर आणि संगीता पवार यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

![]()







