जळगाव समाचार | ८ मे २०२६
जैन हिल्स परिसरात संशोधन व लागवड करण्यात आलेल्या विविध आंबा प्रजातींचे भव्य ‘मॅंगो फिएस्टा-२०२६’ प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी शिरसोली रोडवरील गौराई ग्रामोद्योगच्या दालनात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी दिल्ली येथील Indian Potash Limited चे जनरल मॅनेजर यू. एन. सिंग, स्वरूप लुंकड, आंतरराष्ट्रीय आंबा तज्ज्ञ डॉ. रामचंद्र गुंजाटे, अतुल जैन, सौ. ज्योती जैन, सौ. शोभना जैन, अंबिका जैन, अन्मय जैन यांच्यासह जैन परिवारातील सदस्य उपस्थित होते. तसेच डॉ. अनिल ढाके, डॉ. बी. के. यादव, डॉ. के. बी. पाटील, डॉ. निर्मल बाबू, बी. डी. जडे, शंकर गाडेकर, नितीन पाटील, अजय काळे आदी मान्यवर व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी अशोक जैन व ज्योती जैन यांच्या हस्ते आंबावृक्षाचे विधिवत पूजन करण्यात आले.
जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडच्या शेती संशोधन, विकास व प्रात्यक्षिक केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात भारतासह विविध देशांतील तब्बल १६० हून अधिक आंबा प्रजातींचा समावेश करण्यात आला आहे. जैन इरिगेशनद्वारे विकसित करण्यात आलेल्या टिश्यूकल्चरच्या १३ प्रजाती तसेच जैन संकरित (हायब्रीड) आंब्यांच्या ४९ प्रजाती येथे प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. याशिवाय थायलंड, मेक्सिको, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, ब्राझील आणि इस्रायल येथील विविध विदेशी आंबा जातींचे प्रदर्शनही या ठिकाणी पाहावयास मिळत आहे.
जगातील सर्वाधिक महागडा म्हणून ओळखला जाणारा ‘मियाझाकी’ आंबादेखील प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरत आहे. आंब्यांच्या दुर्मीळ व चविष्ट जाती एकाच छताखाली पाहण्याची संधी या प्रदर्शनामुळे नागरिकांना उपलब्ध झाली आहे. प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेली आंब्याची भव्य कलाकृतीही उपस्थितांचे लक्ष वेधून घेत आहे.
‘मॅंगो फिएस्टा-२०२६’ हे प्रदर्शन ८ व ९ मे रोजी सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार असून, नागरिकांनी प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

![]()




