महापौर दीपमाला काळे यांचा महापालिका शाळा उन्नतीसाठी कृती कार्यक्रम

 

जळगाव समाचार | ५ मार्च २०२६

जळगाव महानगरपालिकाच्या नवनियुक्त महापौर दीपमाला काळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या महिन्याभरात प्रशासनाला गती देत महापालिका शाळांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी ठोस पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. सोमवारी, २ मार्च रोजी महापालिकेच्या सभागृहात शिक्षण विभागाची पहिली महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहरातील सर्व महापालिका शाळांची सद्यस्थिती, विद्यार्थीसंख्या, इमारतींची अवस्था, शिक्षकांची उपलब्धता तसेच शालेय पोषण आहार योजनेची अंमलबजावणी यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीदरम्यान अनेक शाळांची अवस्था चिंताजनक असल्याचे वास्तव समोर आले. काही शाळांच्या इमारतींची पडझड झालेली असून दुरुस्तीची तातडीची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले, तर काही ठिकाणी विद्यार्थीसंख्या अत्यल्प असल्यामुळे वर्गखोल्या ओसाड पडल्याचे स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर महापौर दीपमाला काळे यांनी “शाळा ओसाड पडायला नकोत, त्या गजबजलेल्या असायला हव्यात,” असे स्पष्ट मत व्यक्त केले. शहरातील पालकांचा विश्वास संपादन करून विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक आणि परिणामकारक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.

विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करण्यासाठी शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रम प्रभावीपणे राबविण्याची गरज बैठकीत अधोरेखित करण्यात आली. मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी नवकल्पनांवर आधारित ‘ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग’ पद्धतीचा अवलंब करण्याचा विचार पुढे आला. बदलत्या शैक्षणिक प्रवाहानुसार अध्यापन अधिक प्रभावी करण्यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन कार्यशाळांद्वारे प्रशिक्षण देण्यात यावे, तसेच त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्यात यावे, असा प्रस्तावही चर्चिला गेला. यासोबतच शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीचा सविस्तर अहवाल पुढील बैठकीत सादर करण्याचे आदेश महापौरांनी दिले.

पुढील आठवड्यात सर्व शाळांची अद्ययावत माहिती, आवश्यक निधी, मनुष्यबळ व सुविधा यांचा तपशील घेऊन सविस्तर बैठक आयोजित करण्यात येणार असून त्या बैठकीत सर्वसमावेशक ‘कृती कार्यक्रम’ जाहीर करण्यात येईल, असे महापौरांनी स्पष्ट केले. शिक्षण विभागाने सर्व सूचना आणि आवश्यक कागदपत्रांसह तयारीत राहावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

या आढावा बैठकीस शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी खलील शेख, मुख्याध्यापक सचिन बोरसे, मनीषा सूर्यवंशी, वर्षा पगारे तसेच विभागातील इतर कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी महापौरांच्या सूचनांनुसार शाळांच्या विकासासाठी आवश्यक सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. महापौर दीपमाला काळे यांच्या सक्रिय भूमिकेमुळे महापालिका शाळांच्या उन्नतीसाठी प्रशासन अधिक गतिमान होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here