परीक्षा देऊनही TYBCA विद्यार्थ्यांना निकालात ‘गैरहजर’; मनविसेचा विद्यापीठाला आंदोलनाचा इशारा

 

जळगाव समाचार | २९ मे २०२६

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. परीक्षा देऊनही TYBCA च्या विद्यार्थ्यांना निकालात ‘गैरहजर’ (Absent) दाखविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) विद्यापीठ प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

चोपडा येथील दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील TYBCA चे विद्यार्थी एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या विद्यापीठाच्या परीक्षेला उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी ‘BCA 603 : Android Application Development’ या विषयाची परीक्षा दिली होती. मात्र, विद्यापीठाने नुकत्याच जाहीर केलेल्या निकालामध्ये संबंधित विद्यार्थ्यांना सदर विषयात ‘गैरहजर’ दाखविण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर मनविसेच्या वतीने परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक योगेश पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये संबंधित परीक्षा केंद्रावरील उपस्थिती पत्रकांची तातडीने पडताळणी करून प्रकरणाची चौकशी करावी, दोषी घटकांवर कारवाई करावी तसेच बाधित विद्यार्थ्यांचा सुधारित निकाल तातडीने जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी मनविसेचे जिल्हाध्यक्ष कल्पेश राजेंद्र पवार यांनी विद्यापीठ प्रशासनावर टीका करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून पेपर दिला आहे. याचे पुरावे उपस्थिती पत्रकांमध्ये उपलब्ध असताना त्यांना गैरहजर दाखविणे हा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ आहे. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेतली नाही तर मनविसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”

निवेदन देताना मनविसेचे जिल्हाध्यक्ष कल्पेश पवार, तालुका संघटक चेतन पवार, विद्यार्थिनी वर्षा घाडगे, लीना चौधरी, प्रिया धनगर, चैताली खोंडे यांच्यासह महाराष्ट्र सैनिक आणि बाधित विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here