जळगाव समाचार | १३ नोव्हेंबर २०२६
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पाचोरा तालुक्यातील राजकीय समीकरणे पुन्हा बदलण्याची चिन्हे आहेत. आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित किशोर पाटील यांचा छाननीत बाद झालेला उमेदवारी अर्ज अपिलात वैध ठरल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक विभागीय सहनिबंधकांकडे दाखल केलेल्या अपिलानंतर हा दिलासा मिळाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पाचोरा तालुका प्राथमिक कृषी पतपुरवठा विकास सेवा संस्था मतदारसंघातील निवडणुकीत पुन्हा चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सुमित पाटील यांनी या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, भाजपचे उमेदवार सतीश परशुराम शिंदे यांनी त्यांच्या अर्जावर हरकत घेत ठरावातील तांत्रिक त्रुटीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर सुनावणी घेतल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुमित पाटील यांचा अर्ज नामंजूर केला. परिणामी, या मतदारसंघातून सतीश शिंदे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
या निर्णयाविरोधात सुमित पाटील यांनी नाशिक विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले. अपिलावरील निर्णयात त्यांचा अर्ज वैध ठरल्याची माहिती पुढे आल्याने निवडणुकीचे चित्र बदलले आहे. अर्ज बाद झाल्यानंतर सुमित पाटील यांनी या निर्णयामागे अदृश्य शक्तींचा दबाव असल्याचा आरोप केला होता. आता अपिलातून दिलासा मिळाल्याने त्यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, या जागेवर सुमित पाटील यांची उमेदवारी आमदार किशोर पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. दुसरीकडे, सतीश शिंदे यांच्या बिनविरोध निवडीची शक्यता निर्माण झाल्याने भाजपच्या गोटात अनुकूल स्थिती होती. मात्र, अपिलातील निर्णयामुळे दोन्ही गटांसमोर नव्याने राजकीय गणिते मांडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पाचोरा तालुक्यातील सहकार क्षेत्रातील ही निवडणूक आता अधिक लक्षवेधी ठरणार असून, अंतिम उमेदवारांची स्थिती आणि पुढील निवडणूक प्रक्रियेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

![]()







