जळगाव समाचार | १२ नोव्हेंबर २०२६
दिवाळीची सुटी संपल्यानंतर कार्यालयीन कामकाजाच्या पहिल्याच दिवशी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सामूहिक रजांमुळे शासकीय कामकाजावर परिणाम झाल्याचे चित्र शुक्रवारी पाहायला मिळाले. विविध विभागांतील कर्मचारी मोठ्या संख्येने रजेवर असल्याने कामानिमित्त जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिकांना आवश्यक अधिकारी-कर्मचारी उपलब्ध झाले नाहीत. परिणामी, अनेकांना आपली कामे न करताच माघारी परतावे लागले. सुटीनंतर कार्यालयात कामे मार्गी लागतील, या अपेक्षेने आलेल्या नागरिकांची मात्र निराशा झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील उपलब्ध विभागनिहाय माहितीनुसार, आस्थापना विभागातील ११ पैकी ४, महसूल विभागातील ११ पैकी ७, गृह विभागातील ७ पैकी ३ आणि कुळ कायदा विभागातील ७ पैकी ३ कर्मचारी रजेवर होते. टंचाई व आपत्ती व्यवस्थापन विभागातील ५ पैकी २, गौण खनिज विभागातील ५ पैकी २, ग्रामपंचायत शाखेतील ६ पैकी ३ कर्मचारी गैरहजर होते. नगरपालिका शाखेतील १२ पैकी ३, तर जनगणना कक्षातील १२ पैकी ३ कर्मचारी रजेवर असल्याची नोंद होती.
याशिवाय पुनर्वसन विभागातील ६ पैकी ३, रोजगार हमी योजना (रोहयो) विभागातील ७ पैकी ३, तर सामान्य व हिशेब विभागातील १७ पैकी तब्बल १० कर्मचारी रजेवर होते.
दिवाळीनंतरच्या पहिल्याच कामकाजाच्या दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी रजेवर असल्याने नागरिकांना कार्यालयाचे हेलपाटे मारण्याची वेळ आली. विशेषतः दूरवरून आलेल्या नागरिकांचा प्रवास आणि वेळ दोन्ही वाया गेले. शासकीय कार्यालयांमध्ये सुट्टीनंतर प्रलंबित कामांचा निपटारा होणे अपेक्षित असताना कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे नागरिकांची गैरसोय झाल्याचे चित्र होते.

![]()







