जळगाव समाचार | १९ एप्रिल २०२६
मेहरूण तलावाजवळील कांताईनगर येथील जैन ड्रीम स्पेसेसच्या भव्य क्रीडांगणावर सुरू असलेल्या जळगाव क्रिकेट लिग-२०२६ (JCL T-20) स्पर्धेत उत्साह शिगेला पोहोचला असून प्रेक्षकांची मोठी गर्दी उसळत आहे. जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स यांच्या प्रायोजकत्वाखाली आणि अलरीक इलेक्ट्रिकल्सच्या सहप्रायोजकत्वाखाली आयोजित तिसऱ्या सामन्यात जळगाव कोगटा किंग संघाने अमळनेर सुहांस जायंटस संघावर ३१ धावांनी विजय मिळवला. नाणेफेक अमळनेर सुहांस जायंटसचा कर्णधार शुभम शर्मा याने जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बीसीसीआयचे पंच विनित कुलकर्णी व जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी पंकज बऱ्हाटे यांच्या हस्ते नाणेफेक पार पडली.
फलंदाजीस उतरलेल्या जळगाव कोगटा किंग संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत दमदार धावसंख्या उभी केली. ओम भोसले आणि जितेंद्र नाईक यांनी पहिल्या चार षटकांत ४४ धावांची भागीदारी रचली. गौरव ठाकूरने जितेंद्र नाईकला बाद करत ही जोडी फोडली असली तरी त्यानंतर ओम भोसलेने सामन्याची सूत्रे हाती घेत अवघ्या ६५ चेंडूत ८ चौकार व १० षटकारांच्या जोरावर १३० धावांची वादळी खेळी करत सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावले. अक्षय मेघानीने २७ चेंडूत ३३ धावांची साथ दिल्याने संघाने निर्धारित २० षटकांत ५ बाद २२० धावांचा भक्कम डोंगर उभारला.
२२० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अमळनेर सुहांस जायंटसची सुरुवात डळमळीत झाली. कर्णधार शुभम शर्मा याने ३९ चेंडूत ५ चौकार व ४ षटकारांसह ६८ धावा करत झुंज दिली. मानव टिभीरीवाला याने १९ चेंडूत ३४ धावा तर रणजीत निकम याने १५ चेंडूत २५ धावा करत काही काळ सामना रंगतदार केला. मात्र जळगाव कोगटा किंगच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत प्रतिस्पर्ध्यांना २० षटकांत ६ बाद १८९ धावांवर रोखले. मनिष चौहान याने ४ षटकांत ४० धावा देत ३ महत्त्वपूर्ण बळी घेतले, तर कर्णधार जगदीश झोपे आणि बिपीन चांगरे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. या विजयासह जळगाव कोगटा किंग संघाने सलग दोन सामने जिंकत ४ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. सामनावीराचा पुरस्कार सलग दुसऱ्यांदा ओम भोसले याला देण्यात आला, तर डॉट बॉलसाठी राज बेलदार याचा गौरव करण्यात आला. सामन्यावेळी प्रेम कोगटा, राजेंद्र लढ्ढा, चंदन महाजन, विराज कावडीया, अजय अग्रवाल आणि नितीन पाटील यांची उपस्थिती होती. पंच म्हणून मंगेश नार्वेकर व संदीप गांगुर्डे यांनी, तर गुणलेखनासाठी मोहम्मद फजल यांनी काम पाहिले.

![]()



