जळगावात विनापरवाना बांधकामावर मनपाची कारवाईची तयारी; तळमजला व पहिल्या मजल्यावरील दुकानांचा समावेश
जळगाव समाचार | ४ सप्टेंबर २०२६
जळगाव शहरातील स्टेडियम कॉम्प्लेक्ससमोरील विनापरवाना व अनधिकृत बांधकामाचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. जळगाव शहर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने संबंधित मिळकतधारकांना नोटीस बजावत ३० दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. समाधानकारक खुलासा न दिल्यास संबंधित बांधकामाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मनपाने दिला आहे.
नगररचना विभागाकडून कैलास पितांबर पवार आणि संजय पितांबर पवार यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. नोटिशीनुसार, जळगाव नगररचना योजना क्र. २, अ.भू.क्र. २१७ येथील मिळकतीमध्ये तळमजला तसेच पहिल्या मजल्यावरील दुकानांचे विनापरवाना/अनधिकृत बांधकाम झाल्याचे मनपाच्या निदर्शनास आले आहे.
परवानगी घेतली आहे का?
सदर बांधकामासाठी महानगरपालिकेची आवश्यक बांधकाम परवानगी घेतली आहे किंवा नाही, याबाबत मनपाने आक्षेप नोंदविला आहे. त्यामुळे संबंधितांनी बांधकामासंदर्भातील सर्व आवश्यक कागदपत्रांसह मनपा कार्यालयात उपस्थित राहून लेखी खुलासा सादर करावा, असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
यासाठी संबंधितांना ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत समाधानकारक खुलासा किंवा आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यास, संबंधित बांधकामाविरोधात नियमानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा मनपाने दिला आहे.
स्वतःच्या खर्चाने बांधकाम पाडावे लागणार?
मनपाच्या नोटिशीत अनधिकृत बांधकामाबाबत कठोर भूमिका घेण्यात आली असून, कारवाईदरम्यान बांधकाम पाडण्याची वेळ आल्यास त्याची जबाबदारी संबंधितांवरच राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच बांधकाम पाडण्याची कारवाई झाल्यास त्याचा खर्चही संबंधितांकडून वसूल केला जाऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.
नेमके बांधकाम किती?
मनपाच्या नोटिशीत नमूद केलेल्या वर्णनानुसार, तळमजला आणि पहिल्या मजल्यावरील दुकानांचे सुमारे ९.९० मीटर × ५.३० मीटर आकाराचे विनापरवाना/अनधिकृत बांधकाम झाल्याचा उल्लेख आहे.
मनपाने बजावलेल्या या नोटिशीनंतर आता संबंधितांकडून कोणता खुलासा सादर केला जातो आणि त्यानंतर महानगरपालिका प्रत्यक्ष कारवाई करते का, याकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे.
![]()






