चौक-दुभाजक सुशोभीकरणात नियमभंग; मनपाकडून ११ संस्था, कंपन्यांना नोटिसा…

 

जळगाव समाचार | २८ जुलै २०२६

जळगाव शहर महानगरपालिकेने शहरातील चौक व दुभाजकांच्या सुशोभीकरणाच्या कामांमध्ये नियमांचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी कठोर पाऊल उचलत नियमभंग करणाऱ्या ११ संस्था व कंपन्यांना नोटिसा बजावल्या आहेत. महानगरपालिका आयुक्तांनी २४ जुलै २०२६ रोजी दिलेल्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली असून, करारातील अटींचे पालन न करणाऱ्या तसेच परवानगीपूर्वी जाहिराती लावणाऱ्या संबंधितांवर पुढील नियमानुसार कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

महानगरपालिकेने हॉटेल रॉयल पॅलेस, आर. एल. ज्वेलर्स, भंगाळे गोल्ड, आदित्य फार्म, सुप्रीम इंडस्ट्रीज, अदानी सिमेंट, डायनामिक्स मल्टी प्रो, जैन इरिगेशन, सरस्वती फोर्ड, आर. सी. बाफना आणि जी. एम. फाउंडेशन या संस्था व कंपन्यांना नोटिसा पाठवून करारातील सर्व अटी व शर्तींचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. संबंधितांनी सुशोभीकरणाची कामे पूर्ण केल्यानंतर महानगरपालिकेकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेणे बंधनकारक असून, एनओसी मिळण्यापूर्वी कोणत्याही प्रकारची जाहिरात, नावाचे फलक किंवा व्यावसायिक प्रसिद्धी करणारे फलक उभारू नयेत, असे नोटिशीत स्पष्ट करण्यात आले आहे.

महानगरपालिकेच्या निदर्शनास आले आहे की, काही ठिकाणी काम पूर्ण होण्यापूर्वीच संबंधित संस्था किंवा कंपन्यांनी आपल्या नावाचे फलक व जाहिराती लावल्या आहेत. अशा सर्व जाहिराती संबंधितांनी दोन दिवसांच्या आत स्वतःहून हटवाव्यात, अन्यथा महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत त्या काढून टाकण्यात येतील आणि संबंधितांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच ज्या संस्था किंवा कंपन्यांनी अद्याप सुशोभीकरणाची कामे सुरू केलेली नाहीत, त्यांनी महानगरपालिकेची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणतेही काम सुरू करू नये, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

शहरातील चौक आणि दुभाजकांचे सुशोभीकरण करताना अनधिकृत जाहिरातींमुळे होणारे विद्रूपीकरण रोखणे, कराराच्या अटींची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि शहराचे सौंदर्य अबाधित ठेवणे हा या कारवाईमागील प्रमुख उद्देश असल्याचे स्पष्ट झाले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर भूमिका कायम ठेवण्यात येणार असल्याचे संकेत महानगरपालिकेने या नोटिसांद्वारे दिले असून, सुशोभीकरणाची कामे नियमबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्याचे आवाहनही संबंधित संस्था व कंपन्यांना करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here