कॉकरोच पार्टीच्या अभूतपूर्व यशानंतर आता शुद्ध पेट्रोलसाठी सोशल मीडियावर ‘E20 जनता पार्टी’ सक्रिय

 

जळगाव समाचार | २७ जुलै २०२६

 

देशात इथेनॉल मिश्रित E20 पेट्रोलच्या वापराबाबत सुरू असलेल्या चर्चेला आता सोशल मीडियावरील नव्या नागरिक अभियानाची जोड मिळाली आहे. ‘E20 जनता पार्टी’ या नावाने सुरू झालेल्या डिजिटल मोहिमेने देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर E20 पेट्रोलसोबत 100 टक्के शुद्ध (इथेनॉल-फ्री) पेट्रोल उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. ही कोणतीही नोंदणीकृत राजकीय पक्ष किंवा अधिकृत संघटना नसून, स्वतःला सर्वसामान्य वाहनधारकांचा आवाज म्हणवणारे स्वतंत्र नागरिक अभियान असल्याचा दावा या मोहिमेच्या आयोजकांनी केला आहे. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनांमुळे काही दिवस चर्चेबाहेर गेलेला E20 पेट्रोलचा मुद्दा आता पुन्हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

या अभियानामागील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, केंद्र सरकारने E20 इंधनाला प्रोत्साहन देण्यास त्यांचा विरोध नाही. मात्र, ग्राहकांना त्यांच्या वाहनासाठी कोणते इंधन वापरायचे याचा निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार असावा. वाहन उत्पादकांनी ज्या प्रकारच्या इंधनाची शिफारस केली आहे, तेच इंधन बाजारात सहज उपलब्ध व्हावे, अशी त्यांची भूमिका आहे. सामान्य नागरिकांच्या वाहनांवर इंधनविषयक प्रयोग सक्तीने लादले जाऊ नयेत, तसेच “आमची वाहने प्रयोगशाळा नाहीत” असा संदेश देत ग्राहकांच्या निवडीच्या अधिकारावर भर देण्यात आला आहे. इंधनाचा खर्च, इंजिनची कार्यक्षमता आणि वाहनांच्या दीर्घकालीन देखभालीचा थेट परिणाम मध्यमवर्गीयांच्या अर्थकारणावर होत असल्याने हा विषय सार्वजनिक चर्चेत यावा, अशी मागणीही या अभियानातून करण्यात आली आहे.

‘X’ (पूर्वीचे ट्विटर) आणि इन्स्टाग्रामसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर E20 जनता पार्टीच्या नावाने स्वतंत्र हँडल सुरू करण्यात आले असून, त्यावर E20 पेट्रोलसंदर्भातील माहिती, प्रश्न, मीम्स आणि व्यंगात्मक पोस्ट सातत्याने प्रसिद्ध केल्या जात आहेत. या मोहिमेला अल्पावधीत मोठा प्रतिसाद मिळत असून, ‘X’ वरील फॉलोअर्सची संख्या एका दिवसात सुमारे 13 हजारांवरून 45 हजारांहून अधिक झाली आहे. इन्स्टाग्रामवरही सुमारे 8,800 वरून 1.44 लाखांपर्यंत फॉलोअर्स वाढल्याचा दावा करण्यात आला आहे. अभियानाच्या सोशल मीडिया हँडलवर कोणत्याही राजकीय पक्षाशी किंवा विचारसरणीशी संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, ग्राहकांचे हक्क, धोरणातील पारदर्शकता आणि सार्वजनिक चर्चेला चालना देणे हाच या मोहिमेचा उद्देश असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर या मोहिमेची तुलना यापूर्वी चर्चेत आलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी (CJP)’ या व्यंगात्मक नागरिक अभियानाशी केली जात आहे. मे 2026 मध्ये सुरू झालेल्या त्या मोहिमेने NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावर सोशल मीडियावर मोठी जनजागृती केली होती. त्यानंतर हा विषय राष्ट्रीय पातळीवर गाजला आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिला. त्याच धर्तीवर आता E20 जनता पार्टी इंधन धोरणाबाबत ग्राहकांच्या निवडीच्या अधिकाराचा मुद्दा पुढे आणत असून, सोशल मीडियावरील वाढता प्रतिसाद पाहता ही मोहीम आगामी काळात अधिक व्यापक स्वरूप धारण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here