भोकर येथे रेस्टॉरंटवर अन्न व औषध प्रशासनाची धाड; अन्न नमुने जप्त…

 

जळगाव समाचार | २८ मे २०२६

अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत प्राप्त झालेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन, जळगाव कार्यालयाच्या पथकाने भोकर, ता. जि. जळगाव येथील “श्री चक्रधर रेस्टॉरंट अॅण्ड कोल्ड्रींक्स” या आस्थापनावर अचानक तपासणी कारवाई केली. ही कारवाई २७ मे २०२६ रोजी करण्यात आली असून संबंधित आस्थापनातून दोन अन्न नमुने विश्लेषणासाठी जप्त करण्यात आले आहेत.

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी रेस्टॉरंटमधील अन्नपदार्थांची गुणवत्ता, सुरक्षितता व मानकांची तपासणी केली. तपासणीदरम्यान संशयित अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळा विश्लेषणासाठी घेण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहायक आयुक्त (अन्न व औषध प्रशासन) स. कृ. कांबळे यांनी दिली.

ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे तसेच नाशिक विभागाचे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. नागरिकांनी अन्नपदार्थांच्या गुणवत्ता व दर्जाबाबत सतर्क राहावे तसेच भेसळ अथवा निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांबाबत तक्रारी असल्यास १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर किंवा acfdajalgaon@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन कार्यालय, आंबेडकर मार्केट, जळगाव येथेही प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here