जळगाव समाचार | ३१ जुलै २०२६
जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विविध ठिकाणी तातडीने उपाययोजना व बचावकार्य सुरु असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.
जळगाव शहरातील गांधी मार्केट परिसरातील बेसमेंटमधील सर्व दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. सद्यस्थितीत काही दुकाने पाण्यामुळे बंद ठेवण्यात आली असून, काही दुकानदारांनी आवश्यक ती खबरदारी घेत व्यवसाय सुरू ठेवला आहे. संबंधित यंत्रणांकडून पाणी उपसण्याचे व आवश्यक उपाययोजनांचे काम सुरू आहे.
बोदवड येथे पावसामुळे पाणी साचलेल्या भागात नगरपालिकेची यंत्रणा तात्काळ दाखल झाली असून, कचरा हटविणे, नाल्यांतील अडथळे दूर करणे तसेच साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परिस्थितीवर प्रशासनातर्फे सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे व अनावश्यकपणे पाणी साचलेल्या भागात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
भुसावळ शहरातही पावसामुळे पाणी साचलेल्या ठिकाणी नगरपालिकेच्या यंत्रणेकडून तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत. कचरा हटविणे, नाल्यांतील अडथळे दूर करणे तसेच साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
दरम्यान, भडगाव तालुक्यातील मौजे बात्सर येथे मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी वाढल्याने ५ लहान बालके व ३ महिला घरात अडकून पडल्या होत्या. माहिती मिळताच प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन पथकाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून यशस्वी बचाव कार्य राबविले. यावेळी पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील तसेच तहसीलदार, भडगाव उपस्थित होते.
बचाव कार्यादरम्यान सर्व ५ बालके व ३ महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यांची गावातच सुरक्षित निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून, सर्वजण सुरक्षित आहेत. प्रशासनाकडून संपूर्ण परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत असून, आवश्यक त्या उपाययोजना सुरू आहेत.
यावल तालुक्यातील वड्री धरण, निंबा देवी धरण व मनू देवी धबधबा परिसरात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वड्री धरण व निंबा देवी धरणाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच पावसामुळे मनू देवी धबधबा देखील प्रवाहित झाला असून परिसरातील नागरिकांना तसेच पर्यटकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरण परिसर, धबधबा, नदी-नाले, पूल, पाण्याचा वेग असलेले प्रवाह तसेच पाण्याखाली गेलेले रस्ते यांच्या जवळ जाणे अथवा अनावश्यक वावर टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

![]()





