जळगाव समाचार | २५ मार्च २०२६
भुसावळ महामार्गावरील साकेगाव येथील गोदावरी रुग्णालयात मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर झालेल्या कथित हलगर्जीपणामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची तक्रार मंगळवारी नशिराबाद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. स्वप्नील रोहिदास बनसोडे असे मृत तरुणाचे नाव असून त्याच्या कुटुंबीयांनी संबंधित डॉक्टर व रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.
मृत स्वप्नील बनसोडे याचा भाऊ शुभम बनसोडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, फेब्रुवारी महिन्यात स्वप्नीलला कमरेत तीव्र वेदना होत असल्याने तो साकेगाव येथील गोदावरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. तेथे वैद्यकीय तपासणीनंतर त्याला मणक्याची शस्त्रक्रिया करावी लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार ९ फेब्रुवारी रोजी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि काही दिवसांतच त्याला घरी सोडण्यात आले.
घरी परतल्यानंतर शस्त्रक्रियेच्या जागी सूज येऊन पस साचल्याने त्याची प्रकृती बिघडली. यानंतर त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे पस काढल्यानंतर पुन्हा शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यावेळी आवश्यक असलेल्या एक्स-रे, एमआरआय किंवा अन्य प्राथमिक वैद्यकीय चाचण्या न करता शस्त्रक्रिया केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
२४ फेब्रुवारी रोजी सकाळी शुभम बनसोडे रुग्णालयात भावाला भेटण्यासाठी गेले असता स्वप्नीलच्या शरीरावर सूज दिसून आली. त्यावेळी डॉक्टरांनी त्याच्या किडनी आणि लिव्हरवर सूज आल्याचे सांगितले. पुढील उपचारासाठी दुसऱ्या खासगी रुग्णालयात नेण्याच्या उद्देशाने वैद्यकीय अहवालांची फाईल मागितली असता ती देण्यास नकार देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर स्वप्नीलला दुसऱ्या वॉर्डात हलवण्यात आले आणि कुटुंबीयांना भेटण्यास मज्जाव करण्यात आला.
दरम्यान, त्याच्यावर सीपीआर देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. नंतर डॉ. पंडीत नावाच्या डॉक्टरांनी त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे सांगितले. प्रकृतीविषयी विचारणा केल्यावर समाधानकारक माहिती देण्याऐवजी गुगलवर शोध घेण्याचा सल्ला देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. काही वेळाने कुटुंबीयांनी स्वप्नीलला पाहण्याचा प्रयत्न केला असता त्याला व्हेंटिलेटरवरून काढून मृत घोषित करण्यात आल्याचे समोर आले.
या संपूर्ण प्रकरणात गोदावरी रुग्णालय व संबंधित डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे स्वप्नील बनसोडे याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत शुभम बनसोडे यांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच मृतदेहाचे शवविच्छेदन इन कॅमेरा पद्धतीने करण्यात यावे आणि व्हिसेरा नमुने नाशिक येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
या प्रकरणाची नशिराबाद पोलीस ठाण्याकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

![]()




