महागाईची मार ग्राहकांच्या खिशावर अधिकचा भार; घरगुती गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागले…


जळगाव समाचार | ७ एप्रिल २०२५

सामान्य नागरिकांना मोठा झटका देणारी बातमी समोर आली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत आज सोमवारपासून (७ एप्रिल) थेट ५० रुपयांची वाढ झाली आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ही माहिती दिली आहे.

या वाढीनंतर दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला जबरदस्त कात्री लागणार आहे.

गेल्यावेळी सरकारने लोकसभा निवडणुकीवेळी महिला दिनाच्या निमित्ताने, ८ मार्च २०२४ रोजी मोठ्या गाजावाजा करून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची कपात केली होती.

पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितले की, गॅस कंपन्यांनी ग्राहकांना मूळ किमतीपेक्षा कमी दराने गॅस विकल्यामुळे त्यांना तब्बल ४१ हजार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. हे नुकसान भरून काढण्यासाठीच किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, १ एप्रिल रोजी व्यावसायिक वापरासाठी असलेल्या १९ किलो गॅस सिलिंडरच्या किंमतीत मात्र कपात करण्यात आली होती. दिल्लीत ४१ रुपयांची कपात होऊन तो सिलिंडर १७६२ रुपयांना मिळू लागला. कोलकातात ४४.५० रुपयांची कपात झाली असून नवीन किंमत १८६८.५० रुपये आहे. मुंबईत ही किंमत ४२ रुपयांनी घटून १७१३.५० रुपये झाली आहे.

तेल कंपन्या दर महिन्याला आंतरराष्ट्रीय बाजारातील एलपीजी किंमत, डॉलरचा विनिमय दर, वाहतूक खर्च आणि डीलर कमिशन लक्षात घेऊन अंतिम किरकोळ दर निश्चित करतात. अनुदानित गॅससाठी सरकार फरकाची भरपाई करते, मात्र विनाअनुदानित सिलिंडरसाठी ग्राहकांना संपूर्ण रक्कम भरावी लागते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here