जळगाव समाचार | ६ जानेवारी २०२६
पुण्याचे माजी खासदार, केंद्रीय मंत्री तसेच क्रीडा क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व सुरेश कलमाडी यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते आजारपणाशी झुंज देत होते. त्यांच्या निधनाने पुणे शहरासह राज्याच्या राजकीय, सामाजिक व क्रीडा क्षेत्रात तीव्र शोक व्यक्त केला जात आहे. अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
सुरेश कलमाडी यांचे पार्थिव आज दुपारी २ वाजेपर्यंत त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. पुणे शहरातील विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते, क्रीडाप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी उपस्थित राहत आहेत.
भारतीय हवाई दलात पायलट म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणारे सुरेश कलमाडी पुढे राजकारणात सक्रिय झाले. पुण्याचे खासदार, केंद्रीय मंत्री तसेच भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे (IOA) अध्यक्ष म्हणून त्यांनी दीर्घकाळ जबाबदाऱ्या सांभाळल्या. ‘पुणे फेस्टिव्हल’ आणि ‘पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन’सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी पुणे शहराची ओळख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण केली. सुरेश कलमाडी यांच्या निधनाने एक अनुभवी आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

![]()




