जळगाव समाचार | २५ नोव्हेंबर २०२५
उत्तर प्रदेशातील बागपत येथे रविवारी रात्री घडलेल्या हृदयद्रावक अपघाताने आनंदमय लग्नसोहळ्यावर शोककळा पसरली. पिचोक्रा गावातील रहिवासी सुबोध हा सरुरपूर कलान येथे वरात घेऊन आला होता. पंचायतीजवळ मिरवणूक नाश्ता-जेवणासाठी थांबली असताना अचानक घडलेल्या या दुर्घटनेने सासर-माहेर दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला. घरातील एकुलता एक मुलगा असलेल्या सुबोधच्या निधनाने आनंदाचा उत्सव क्षणात अश्रूंमध्ये बदलला.
नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुबोधला अचानक मळमळ जाणवू लागल्याने तो रस्त्याच्या कडेला गेला. त्या वेळी उलट्या होत असल्याने तो एका गाडीजवळ उभा होता. दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या अनियंत्रित भरधाव ट्रकने त्याला जोरदार धडक दिली. धडकेनंतर सुबोध काही मीटरपर्यंत फरफटत ओढला गेला. गंभीर जखमी अवस्थेत पाहुण्यांनी त्याला तातडीने एका खाजगी रुग्णालयात नेले व नंतर जिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी सुबोधला मृत घोषित केले. जिल्हा रुग्णालयाचे डॉ. राज सिंग यांनी रात्री १०.३० वाजता सुबोधला मृत अवस्थेत आणल्याची पुष्टी केली.
घडनेची माहिती मिळताच बिनौली पोलिस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. ट्रक चालक पळून गेल्याने त्याचा शोध घेण्यासाठी परिसरातील तसेच महामार्गावरील सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचे काम सुरू आहे. कुटुंबाच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. नवरदेव सुबोधच्या दुर्दैवी निधनामुळे वधूच्या स्वप्नांचा संसार सुरू होण्याआधीच उद्ध्वस्त झाला असून संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला आहे.

![]()




