जळगाव समाचार | १८ सप्टेंबर २०२६
जळगाव जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक तथा महाराष्ट्र कॅडरचे २०१२ बॅचचे वरिष्ठ IPS अधिकारी डॉ. एम. सी. व्ही. महेश्वर रेड्डी यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) उपमहानिरीक्षक (DIG) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय प्रतिनियुक्तीवर होणाऱ्या या नियुक्तीचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केले असून, त्यामुळे डॉ. रेड्डी यांच्या सेवेला आता केंद्रातील नवी जबाबदारी मिळाली आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाचे अवर सचिव संजीव कुमार यांनी १६ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून नियुक्तीबाबत कळविले आहे. सक्षम प्राधिकरणाने केंद्रीय सेवेच्या प्रचलित अटी व शर्तींनुसार डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या केंद्रीय प्रतिनियुक्तीस मंजुरी दिल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
जळगावचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जिल्हा पोलीस दलाची जबाबदारी सांभाळली होती. जळगाव पोलिसांच्या अधिकृत नोंदींमध्येही त्यांच्या पोलीस अधीक्षक पदावरील कार्यकाळाचा उल्लेख आहे. त्यांच्या कार्यकाळात पोलीस दलाच्या विविध उपक्रमांसह कारवाईला गती मिळाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
केंद्रातील नवीन जबाबदारी स्वीकारण्यासाठी डॉ. रेड्डी यांना त्यांच्या सध्याच्या पदावरून तात्काळ कार्यमुक्त करण्याचे निर्देश महाराष्ट्र शासनाला देण्यात आले आहेत. नियुक्ती आदेशाची प्रत महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, CISF महासंचालक नवी दिल्ली तसेच केंद्रीय गृह मंत्रालयातील संबंधित विभागांना पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली आहे. या आदेशाचा संदर्भ क्रमांक 1-21016/36/2026-IPS.III असा आहे.

![]()






