जळगाव समाचार | २४ मे २०२६
धुळे तालुक्यातील महिंदळे येथे कौटुंबिक वादातून एका रिक्षाचालकाने स्वतःच्या वृद्ध आईच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना मध्यरात्री घडली. या घटनेत गंभीर भाजलेल्या जिजाबाई भटू खैरनार-पाटील (वय ६५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणामुळे महिंदळे गावासह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, धुळे तालुका पोलिसांनी संशयित प्रदीप उर्फ दगडू भटू खैरनार-पाटील (वय ४५) याला ताब्यात घेतले आहे. घटनेनंतर गावात शोककळा पसरली असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रदीप खैरनार-पाटील हा रिक्षाचालक असून त्याच्या विवाहाबाबत घरात काही काळापासून वाद सुरू होता. आई जिजाबाई खैरनार-पाटील या आपला विवाह लावून देत नसल्याचा संशय त्याच्या मनात निर्माण झाला होता. याच कारणावरून त्याच्या मनात आईविषयी तीव्र नाराजी होती, अशी माहिती समोर आली आहे. रविवारी मध्यरात्री सुमारे दीड वाजेच्या सुमारास प्रदीप मद्यधुंद अवस्थेत घरी आला. त्यावेळी घराच्या अंगणात बसलेल्या आईशी त्याने विवाहाच्या मुद्द्यावरून वाद घातला. काही वेळातच हा वाद विकोपाला गेला आणि संतापाच्या भरात त्याने जिजाबाई यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांना पेटवून दिल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
घटनेनंतर गंभीर भाजलेल्या जिजाबाई खैरनार-पाटील यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला तसेच घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे जप्त केले. संशयित प्रदीप उर्फ दगडू खैरनार-पाटील याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेवेळी तो मद्यधुंद अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असली तरी त्यासंदर्भातील वैद्यकीय अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.
जिजाबाई खैरनार-पाटील या शांत व साध्या स्वभावाच्या महिला म्हणून परिसरात परिचित होत्या. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच नातेवाईकांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. स्वतःच्या मुलाकडून वृद्ध आईवर झालेल्या या अमानुष प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास धुळे तालुका पोलीस करीत आहेत.
![]()






