केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्या पोस्टमधून संभाव्य रचनेचे चित्र समोर; उत्तर प्रदेशात सर्वाधिक १२० जागांचा अंदाज
जळगाव समाचार | २९ नोव्हेंबर २०२६
महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीसह मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दा केंद्रस्थानी आल्याने देशाच्या राजकीय वर्तुळात सीमांकनाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. केंद्रीय विधी व न्यायमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लोकसभेच्या संभाव्य जागावाटपाचा नकाशा प्रसिद्ध केला आहे. या आराखड्यानुसार देशातील लोकसभा मतदारसंघांची संख्या सध्याच्या ५४३ वरून ८१६ पर्यंत वाढण्याची शक्यता दर्शविण्यात आली आहे. यामध्ये २८ राज्यांच्या ७८९ आणि आठ केंद्रशासित प्रदेशांच्या २७ जागांचा समावेश आहे. मात्र, हा संभाव्य जागावाटपाचा आराखडा असून त्याला अंतिम स्वरूप मिळण्यासाठी संबंधित विधेयक आणि घटनात्मक प्रक्रियेची पूर्तता आवश्यक आहे.
प्रस्तावित आकडेवारीनुसार महाराष्ट्राच्या लोकसभा जागांमध्ये २४ ने वाढ होऊन त्या ४८ वरून ७२ होतील. देशातील सर्वाधिक जागा उत्तर प्रदेशात असतील. तेथील सध्याच्या ८० जागा वाढून १२० होण्याचा अंदाज आहे. पश्चिम बंगालमध्ये ४२ वरून ६३, बिहारमध्ये ४० वरून ६०, तामिळनाडूमध्ये ३९ वरून ५९, मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी १४ जागांची वाढ दर्शविण्यात आली आहे. गुजरातमध्ये २६ वरून ३९, आंध्र प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी ३८, तर ओडिशात ३१ आणि केरळमध्ये ३० जागा प्रस्तावित आहेत. तेलंगणात २६, आसाम व झारखंडमध्ये प्रत्येकी २१, तर पंजाबमध्ये २० जागांचा अंदाज आहे.
इतर राज्यांमध्ये छत्तीसगड आणि हरियाणाच्या जागा अनुक्रमे १६ आणि १५ होण्याची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये ८, हिमाचल प्रदेशात ६, तर अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरामध्ये प्रत्येकी ३ जागा दर्शविण्यात आल्या आहेत. मिझोराम, नागालँड आणि सिक्कीममध्ये प्रत्येकी २ जागा प्रस्तावित आहेत. केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिल्लीच्या जागा ७ वरून ११, जम्मू-काश्मीरच्या ५ वरून ७, तर चंदीगड आणि पुदुच्चेरीच्या जागा प्रत्येकी २ होण्याचा अंदाज आहे. दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव यांच्या २ जागा कायम राहतील. अंदमान-निकोबार, लडाख आणि लक्षद्वीपमध्ये प्रत्येकी एक जागा प्रस्तावित आहे.
लोकसभेतील जागांची संभाव्य वाढ आणि महिला आरक्षणाची अंमलबजावणी या दोन्ही मुद्द्यांमुळे आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, राज्यनिहाय जागावाटपाचे अंतिम चित्र सीमांकनाची अधिकृत प्रक्रिया, त्यासाठी निश्चित होणारे निकष आणि संसदेच्या मंजुरीनंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सध्या चर्चेत आलेला ८१६ जागांचा नकाशा हा प्रस्तावित रचनेचा अंदाज म्हणूनच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

![]()







