बी. जे. महाजन विद्यालयात सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती; विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक टाळण्याचे मार्गदर्शन

 

जळगाव समाचार | ६ ऑगस्ट २०२६

 

डिजिटल युगात वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी आणोरे येथील बी. जे. महाजन विद्यालयात सायबर जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी स्नेहल पाटील आणि वैष्णवी पाटील यांनी विद्यार्थ्यांना इंटरनेटचा सुरक्षित वापर, ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव आणि डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने वापर करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ओटीपी फ्रॉड, क्यूआर कोड फसवणूक, ऑनलाइन बँकिंग घोटाळे, एआय व्हॉइस कॉल फ्रॉड, फिशिंग, बनावट लिंक तसेच सोशल मीडियावरील फसवणुकीच्या प्रकारांची उदाहरणांसह माहिती देण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांना मजबूत पासवर्ड तयार करण्याचे महत्त्व, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) चा वापर, अनोळखी व्यक्तींना ओटीपी, बँक खात्याची किंवा वैयक्तिक माहिती न देणे, संशयास्पद लिंकवर क्लिक टाळणे आणि कोणतेही अॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची खातरजमा करणे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सोशल मीडियाचा वापर करताना गोपनीयता जपणे, डिजिटल व्यवहारांमध्ये सतर्क राहणे तसेच सायबर गुन्हा घडल्यास तात्काळ संबंधित यंत्रणेकडे तक्रार नोंदविण्याचे महत्त्वही विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध शंकांचे निरसन करून कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक महाले सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा सकारात्मक व जबाबदारीने वापर करावा, ऑनलाइन व्यवहार करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि सायबर सुरक्षिततेचे नियम दैनंदिन जीवनात अंगीकारावेत, असे आवाहन केले. कार्यक्रमास शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. या जनजागृती उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता वाढून सुरक्षित डिजिटल समाज घडविण्यास निश्चितच हातभार लागेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here