शेंदूर्णीत विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा जनजागृतीचे धडे; २५० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

 

जळगाव समाचार | ४ ऑगस्ट २०२६

श्री कृष्ण माध्यमिक विद्यालय, पाचोरा रोड, शेंदूर्णी (जि. जळगाव) येथे इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती विषयावरील विशेष मार्गदर्शन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. गुरुवारी (दि. ३० जुलै) सकाळी ७ ते ८ या वेळेत झालेल्या या सत्रात सुमारे २५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या चर्चासत्रात प्रियदर्शनी भांडारकर व खुशबू लांबोळे यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेच्या विविध पैलूंविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, विशिंग, स्मिशिंग, ओटीपी व पासवर्ड सुरक्षितता, मजबूत पासवर्ड तयार करण्याचे महत्त्व, द्विस्तरीय प्रमाणीकरण (2-Factor Authentication), सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, बनावट लिंक व क्यूआर कोड स्कॅमपासून सावध राहण्याचे उपाय, सायबर बुलिंग, डिजिटल गोपनीयता, अज्ञात व्यक्तींशी ऑनलाइन संपर्क टाळणे तसेच मोबाईल अॅप्स डाउनलोड करताना घ्यावयाची खबरदारी याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

याशिवाय सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने वापर कसा करावा याविषयीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. संवादात्मक पद्धतीने झालेल्या या सत्रात विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. तसेच सुरक्षित डिजिटल जीवनशैली अंगीकारण्याचा संकल्पही विद्यार्थ्यांनी केला.

या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. मीराबाई इंगळे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनमोल सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here