CSMT स्थानक पुनर्विकासासाठी ८५ दिवसांचा ब्लॉक; अनेक गाड्या दादरपर्यंतच

 

जळगाव समाचार | १ फेब्रुवारी २०२६

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची आणि दिलासा नसलेली बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे पुनर्विकासाच्या कामांमुळे तब्बल ८५ दिवसांचा ट्राफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल अँड डेव्हलपमेंट ऑथोरिटीमार्फत सीएसएमटी स्थानकाच्या फलाट क्रमांक १६ आणि १७ चे पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले असून, यासाठी हे दोन्ही फलाट पूर्णपणे बंद ठेवले जाणार आहेत. या कालावधीत ओव्हरहेड वायर, फलाटांची मजबुतीकरणाची कामे तसेच प्रवाशांच्या सुरक्षेशी संबंधित पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत.

या ब्लॉकमुळे सीएसएमटीवरून धावणाऱ्या अनेक मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. फलाट क्रमांक १६ आणि १७ वरून अमरावती, अकोला, नागपूर, भुसावळ, जळगाव, नांदेड आणि लातूरकडे जाणाऱ्या गाड्या नियमितपणे सुटत असतात. मात्र आता या सर्व गाड्या सीएसएमटीऐवजी दादर स्थानकापर्यंतच धावणार असून, प्रवाशांना दादर येथे उतरावे लागणार आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांना अतिरिक्त प्रवास आणि गैरसोयीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

हे बदल १ फेब्रुवारीपासून पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार आहेत. दरम्यान, काही गाड्यांच्या मार्गातही तात्पुरते बदल करण्यात आले असून, ट्रेन क्रमांक १२१३४ मंगळुरु–सीएसएमटी एक्सप्रेस ही गाडी सीएसएमटीऐवजी ठाणे स्थानकापर्यंतच धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी सुधारित वेळापत्रकाची माहिती घेऊनच घराबाहेर पडण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here