जळगाव समाचार | ८ जुलै २०२६
सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या हव्यासापोटी गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे, भाईगिरीचे प्रदर्शन करणारे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करून जीवघेणी स्टंटबाजी करणारे तसेच महिलांचा अवमान करणारे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि रील्स तयार करून प्रसारित करणाऱ्या ‘रील्स बहाद्दरां’विरोधात जळगाव पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. जिल्हा पोलिसांच्या सायबर सेलने मंगळवारी (७ जुलै) विशेष सायबर पॅट्रोलिंग मोहीम राबवून अशा समाजविघातक कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींचा शोध घेत त्यांना थेट पोलीस मुख्यालयात बोलावले. यावेळी संबंधितांना कायद्याची जाणीव करून देत भविष्यात अशा प्रकारच्या कृत्यांपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला.
सध्या सोशल मीडियावर अल्पावधीत प्रसिद्धी मिळविण्याच्या स्पर्धेत अनेक तरुण धोकादायक आणि कायद्याचे उल्लंघन करणारे व्हिडिओ तयार करत असल्याचे निदर्शनास येत आहे. गुन्हेगारांचे गौरवीकरण करणे, घातक शस्त्रांसह व्हिडिओ चित्रीकरण करणे, वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करत सार्वजनिक रस्त्यांवर स्टंटबाजी करणे तसेच महिलांविषयी आक्षेपार्ह आणि अश्लील आशयाच्या रील्स प्रसारित करणे, या प्रकारांमध्ये वाढ झाल्याची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. अशा कृत्यांचा समाजावर, विशेषतः शालेय विद्यार्थी आणि युवकांवर विपरीत परिणाम होत असून गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जळगाव पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन केले असून, कायद्याचे उल्लंघन करणारे अथवा समाजात तेढ निर्माण करणारे, महिलांचा अवमान करणारे किंवा वाहतुकीस धोका निर्माण करणारे व्हिडिओ, रील्स अथवा पोस्ट प्रसारित करणाऱ्यांवर भविष्यातही कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. समाजमाध्यमांवर प्रसिद्धी मिळविण्यापेक्षा कायद्याचे पालन आणि सामाजिक जबाबदारी जपणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचेही पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

![]()




