खरात प्रकरणी चाकणकरांची गच्छंती कायम; राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा पदाचा राजीनामा

 

जळगाव समाचार | २७ मार्च २०२६

बलात्कार प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित प्रकरणात दररोज नव्या घडामोडी समोर येत असताना या प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावर असलेल्या रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून तो उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे. यापूर्वीच त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला होता.

अशोक खरात प्रकरणातील कथित संबंधांवरून त्यांच्या विरोधात वाढत चाललेल्या राजकीय आणि सामाजिक दबावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी विविध स्तरांवरून होत होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही नेत्यांसह विरोधी पक्षातील नेत्यांनीही त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली होती. अखेरीस या वाढत्या दबावानंतर चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षालाही रामराम ठोकला आहे.

रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावरून दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरात प्रकरणाबाबत त्यांनी सुरुवातीपासूनच आपली भूमिका स्पष्ट केली असून संबंधित व्यक्तीच्या आर्थिक व्यवहारांशी किंवा कथित गैरकृत्यांशी आपला कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी पुन्हा नमूद केले आहे. या प्रकरणाची चौकशी पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने व्हावी, अशी मागणी त्यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. माध्यमांमधून पुराव्यांशिवाय होत असलेल्या आरोपांबाबत त्यांनी खंत व्यक्त करत सत्य समोर येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे, नाशिकमधील काही पदाधिकारी तसेच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. यासंदर्भात रुपाली ठोंबरे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर पक्षांतर्गत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीतही काही आमदारांनी चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याचे समोर आले होते.

या प्रकरणात रुपाली ठोंबरे यांनी चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली होती. कौटुंबिक हिंसाचार किंवा घरगुती वादाच्या तक्रारी घेऊन महिला आयोगाकडे येणाऱ्या पीडित महिलांना योग्य समुपदेशन करण्याऐवजी त्यांना अशोक खरात याच्याकडे जाण्याचा सल्ला दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. न्यायाच्या अपेक्षेने येणाऱ्या महिलांना भोंदू बाबाच्या जाळ्यात अडकवण्यात आल्याचा गंभीर दावा त्यांनी केला असून या प्रकरणात चाकणकर यांची सखोल चौकशी करून त्यांना सहआरोपी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, अशोक खरात प्रकरणातील तपास सुरू असून संबंधित यंत्रणा या प्रकरणातील सर्व पैलूंची चौकशी करत आहेत. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून पुढील काळात या घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here