जळगाव समाचार | १२ मे २०२६
वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) रद्द करण्यात आल्यानंतर देशभरात विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. पेपरफुटीच्या आरोपांनंतर केंद्र सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते Rahul Gandhi यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर निशाणा साधत शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत, “नीट परीक्षा रद्द झाल्याने २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे परिश्रम, त्याग आणि स्वप्न उद्ध्वस्त झाली आहेत,” असा आरोप केला. “लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा मानसिक ताण, आर्थिक ओझे आणि अनिश्चिततेचा सामना करावा लागणार आहे. प्रत्येक वेळी पेपरफुटी करणारे माफिया सुटतात आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांनाच त्याची शिक्षा भोगावी लागते,” असेही त्यांनी म्हटले आहे.
यासोबतच गांधी यांनी शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करत, “अनेक पालकांनी कर्ज काढले, काहींनी दागिने विकले आणि विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस अभ्यास केला. मात्र त्यांना बदल्यात पेपरफुटी, सरकारी निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचार मिळाला. विद्यार्थ्यांचे भविष्य जर कष्टाऐवजी पैसा आणि वशिल्यावर ठरणार असेल, तर शिक्षण व्यवस्थेचा अर्थ काय उरतो?” असा सवाल उपस्थित केला. पंतप्रधानांचा तथाकथित ‘अमृतकाळ’ आता देशासाठी ‘विषकाळ’ ठरत असल्याची टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, ३ मे रोजी देशभरात घेण्यात आलेली नीट परीक्षा पेपरफुटीच्या आरोपांनंतर रद्द करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपविण्यात आली असून, राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) लवकरच नव्या परीक्षेची तारीख जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. परीक्षा पुन्हा घेण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि चिंता वाढली आहे.
यंदा देशातील ५५१ शहरांतील सुमारे ५,४०० परीक्षा केंद्रांवर नीट परीक्षा घेण्यात आली होती. एमबीबीएस, बीडीएस आणि इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठी देशभरातून तब्बल २२.७९ लाख विद्यार्थी बसले होते. पेपरफुटीच्या आरोपांनंतर एनटीएच्या कार्यपद्धतीवर आणि परीक्षा सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

![]()




