शहरात कॉलेज परिसरातील ‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाचा छापा; तरुण-तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत आढळल्याने खळबळ…


जळगाव समाचार | १ ऑक्टोबर २०२६

शहरातील एका नामांकित महाविद्यालयाच्या परिसरातील गजानन चेंबरमध्ये सुरू असलेल्या ‘हेवन कॅफे’वर दामिनी पथक आणि रामानंद नगर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. कॅफेमध्ये अंधाऱ्या कंपार्टमेंटची व्यवस्था करून महाविद्यालयीन तरुण-तरुणींना आक्षेपार्ह चाळ्यांसाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले. या प्रकरणी कॅफे चालक विजय राजेंद्र पाटील (वय २९, रा. इंदिरानगर, खेडी, जि. जळगाव) याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव पोलिस अधीक्षक कार्यालयातील दामिनी पथकातील महिला पोलिस अंमलदार सुनीता जाधव, वैशाली माळी, अंजली राजपूत आणि रीना महाजन या ३० सप्टेंबर रोजी दुपारी कॉलेज परिसरात गस्त घालत होत्या. त्यावेळी महाविद्यालयाच्या परिसरापासून काही अंतरावर असलेल्या ‘हेवन कॅफे’मध्ये अंधार करून तरुण-तरुणींना गैरप्रकारासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर दामिनी पथकाने रामानंद नगर पोलिस ठाणे गाठून पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांना याबाबत माहिती दिली.

पोलिस निरीक्षक साळवे यांच्या सूचनेनुसार पोलिस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोलिस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत, दामिनी पथकातील महिला पोलिस कर्मचारी आणि पंचांसह दुपारी सुमारे ४.१० वाजता कॅफेवर अचानक छापा टाकण्यात आला. कॅफेमध्ये तीन बाय तीन आकाराचे प्लायवूड व पार्टिकल बोर्डचे छोटे कंपार्टमेंट तयार करण्यात आले होते. या कंपार्टमेंटना बाहेरून जाड पडदे लावण्यात आले होते. पोलिसांनी तपासणी केली असता या अंधाऱ्या कंपार्टमेंटमध्ये काही महाविद्यालयीन तरुण-तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी पंचांसमक्ष त्यांची चौकशी करून पालकांच्या उपस्थितीच्या धाकात त्यांना कडक तोंडी समज देऊन सोडून दिले.

दरम्यान, पोलिसांनी कॅफेची झडती घेतली असता तेथे कॉफी शॉप चालविण्यासाठी आवश्यक असलेली कॉफी पावडर, साखर, गॅस शेगडी किंवा इतर खाद्यपदार्थ उपलब्ध नसल्याचे आढळून आले. तसेच कॅफेचा वैध परवाना दर्शनी भागावर आढळला नाही. त्यामुळे कॅफेच्या नावाखाली तरुण-तरुणींना पडद्याआड जागा उपलब्ध करून देण्याचा प्रकार सुरू असल्याचा पोलिसांचा निष्कर्ष आहे. महिला पोलिस अंमलदार सुनीता जाधव यांच्या फिर्यादीवरून चालक विजय राजेंद्र पाटील याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १२९ व १३१ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, रामानंद नगर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here