ब्रेकींग; भुसावळच्या राजकारणाला नवे वळण; अनिल चौधरींसह गायत्री भंगाळे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

 

जळगाव समाचार | ३ सप्टेंबर २०२६

भुसावळच्या राजकारणात महत्त्वाची राजकीय घडामोड घडली आहे. मुंबईतील नंदवन येथे झालेल्या कार्यक्रमात प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी, भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे आणि निखिल संतोष चौधरी यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

शिवसेनेत प्रवेश केलेल्या तिन्ही नेत्यांच्या निर्णयामुळे भुसावळच्या स्थानिक राजकारणात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. भुसावळ तसेच जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी राजकीय ताकद एकत्रित करणे, शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्रभावीपणे मांडणे, हा या राजकीय वाटचालीमागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

या प्रवेशावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते गुलाबराव पाटील, पाचोरा आमदार किशोर पाटील, आमदार बच्चू कडू, चोपडा आमदार चंद्रकांत सोनवणे, मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील, पारोळा आमदार अमोल पाटील, शिवसेना उपनेत्या सरिता माळी-कोल्हे आणि जळगाव जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या मार्गदर्शन व सहकार्याचा उल्लेख करण्यात आला.

अनिल चौधरी आणि गायत्री भंगाळे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे भुसावळच्या राजकीय पटलावर पक्षीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात या घडामोडीचा स्थानिक राजकारणावर नेमका काय परिणाम होतो आणि कोणती नवी राजकीय आघाडी आकाराला येते, याकडे जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here