जळगाव समाचार | २७ जानेवारी २०२६
बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) या नऊ संघटनांच्या संयुक्त मंचाने 27 जानेवारी रोजी देशव्यापी संपाचे आवाहन केले आहे. या संपाचा परिणाम महाराष्ट्रासह देशभरातील बँकिंग सेवांवर होण्याची शक्यता असून, सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख बँकांचे कामकाज ठप्प राहण्याची चिन्हे आहेत. मार्च 2024 मध्ये झालेल्या करारात मान्य करूनही ‘पाच दिवसांचा आठवडा’ अद्याप लागू न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
UFBU च्या माहितीनुसार, बँक कर्मचाऱ्यांची पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी 2015 पासून प्रलंबित आहे. सध्या दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारीच सुट्टी दिली जाते. सर्व शनिवारी सुट्टी देऊन आठवड्यात केवळ पाच दिवस कामकाज असावे, अशी कर्मचाऱ्यांची भूमिका आहे. विशेष म्हणजे, कामाच्या तासांचे नुकसान होऊ नये म्हणून दररोज 40 मिनिटे अतिरिक्त काम करण्यास कर्मचारी तयार असल्याचेही युनियनने स्पष्ट केले आहे. 8 मार्च 2024 रोजी इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि बँक युनियन यांच्यात झालेल्या वेतन सुधारणा करारातील संयुक्त नोटमध्ये सर्व शनिवारी सुट्टी देण्यावर सहमती दर्शवण्यात आली होती; मात्र वित्तीय सेवा विभागाकडून (DFS) अद्याप यास मंजुरी मिळालेली नाही.
या संपात स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक यांसह सर्व प्रमुख सरकारी बँकांचे कर्मचारी सहभागी होणार आहेत. खासगी बँकांचे व्यवहार सुरू राहण्याची शक्यता असली तरी, सरकारी बँकांच्या संपामुळे चेक क्लिअरन्ससारख्या सेवांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ग्राहकांनी 27 जानेवारीपूर्वी महत्त्वाचे व्यवहार पूर्ण करावेत, चेक जमा व मोठे रोख व्यवहार आधीच करावेत, असा सल्ला देण्यात आला आहे. संपाच्या काळात नेट बँकिंग, यूपीआय व मोबाईल बँकिंग सेवा सुरू राहणार असल्या तरी एटीएममधील रोख रकमेचा तुटवडा जाणवू शकतो, त्यामुळे आवश्यक रोकड आधीच काढून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

![]()




