मुंबईत बालरंगभूमी परिषदेची बालनाट्य कार्यशाळा उत्साहात सुरू राज्यभरातून ६० प्रशिक्षणार्थींचा सहभाग

 

जळगाव समाचार | ४ एप्रिल २०२६

बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती शाखा, मुंबई यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय बालनाट्य सादरीकरण कार्यशाळेला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. कार्यशाळेच्या उद्घाटन सोहळ्याला कार्याध्यक्ष राजीव तुलालवार, उपाध्यक्ष शैलेश गोजमगुंडे, प्रमुख कार्यवाह सतीश लोटके, प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल, कोषाध्यक्ष नंदकिशोर जुवेकर, सहकार्यवाह दीपाली शेळके व आसेफ शेख अन्सारी तसेच कार्यकारिणी सदस्य अनंत जोशी, त्र्यंबक वडस्कर, नागसेन पेंढारकर, वैदेही चवरे सोईतकर, सुजय भालेराव आणि वेदा सोनुले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. बालरंगभूमीच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलागुणांना योग्य दिशा मिळावी आणि मराठी बालनाट्य अधिक समृद्ध व्हावे, या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी एकूण पाच सत्रांद्वारे विविध अंगांनी बालनाट्य सादरीकरणाचा वेध घेण्यात आला. ज्येष्ठ दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी दिग्दर्शन या विषयावर सखोल मार्गदर्शन करताना रंगमंचावरील दृश्यरचना, कलाकारांचे सुसूत्र नियोजन आणि प्रेक्षकांवर प्रभाव टाकणाऱ्या दिग्दर्शकीय शैलींचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. प्रतिथयश बालनाट्य लेखक धनंजय सरदेशपांडे यांनी लेखन प्रक्रियेतील कल्पनाशक्ती, संवादातील सहजता आणि बालप्रेक्षकांच्या मानसिकतेचा विचार यावर प्रकाश टाकत उपस्थितांना प्रेरित केले. प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक व कवी राजेश देशपांडे यांनी भाषा, उच्चारशास्त्र व वाचिक अभिनय या विषयांवर मार्गदर्शन करताना संवादातील स्पष्टता, आवाजातील चढ-उतार आणि शब्दफेकीतील अचूकता हे प्रभावी अभिनयाचे मुख्य घटक असल्याचे अधोरेखित केले.

चतुर्थ सत्रात प्रसिद्ध वेशभूषाकार प्रियांका शेळके यांनी वेशभूषेचे रंगमंचावरील महत्त्व पटवून देत पात्रनिर्मितीत पोशाखाचा कसा प्रभाव पडतो, याचे जिवंत उदाहरणांसह सादरीकरण केले. पाचव्या सत्रात बालनाट्य क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व प्रकाश पारखी यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींशी थेट संवाद साधत बालनाट्याच्या सादरीकरणातील बारकावे, प्रयोगशीलता आणि संस्कारक्षमतेवर विचार मांडले.

सायंकाळच्या शेवटच्या सत्रात योगेश शुक्ल यांनी जाहिरात व सोशल मीडिया यावर उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी नाटक किंवा कार्यक्रमाची जाहिरात करताना काय काळजी घेतली पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले, तसेच सोशल मीडियावरील कंटेंट रिच वाढवण्यासंबंधी माहिती दिली. यानंतर ‘रेशीमलडी’ या द्विपात्री दीर्घांकाचा विशेष प्रयोग सादर करण्यात आला. अरुण पटवर्धन आणि दीपाली निरगुडकर यांनी नाट्य, विनोद आणि कवितेचा सुरेख संगम साधत रंगमंचावर सजीव अनुभव उभा केला, ज्याला प्रशिक्षणार्थींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यशाळेमुळे बालनाट्य क्षेत्रात नवी ऊर्जा निर्माण होऊन भावी पिढीतील कलाकारांना सक्षम दिशा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here