जळगावात ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात

 

जळगाव समाचार | २४ एप्रिल २०२६

उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कुटुंबीयांना एकत्रितपणे दर्जेदार मनोरंजनाचा अनुभव मिळावा या उद्देशाने जळगावात ‘गंमत जंमत’ या तीन दिवसीय बालचित्रपट महोत्सवाला आज, २४ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. अजिंठा फिल्म सोसायटी, बालरंगभूमी परिषद आणि रिफ्लेक्शन फाऊंडेशन संचलित ‘पालकशाळा’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून, शहरातील भाऊंचे उद्यान येथील एम्फी थिएटरमध्ये २४, २५ आणि २६ एप्रिल या कालावधीत दररोज सायंकाळी ६.३० वाजता चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे.

या महोत्सवाचे उद्घाटन आज सायंकाळी ६.३० वाजता जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते होणार असून, बालकांसह पालकांसाठी प्रवेश पूर्णतः विनामूल्य ठेवण्यात आला आहे. डिजिटल युगात मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये गुंतलेल्या मुलांना मोठ्या पडद्यावर आशयघन, प्रबोधनात्मक आणि जागतिक दर्जाचे चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे. तसेच पालकांनाही आपल्या बालपणाच्या आठवणींना उजाळा देत मुलांसोबत दर्जेदार वेळ घालवण्याची ही एक आगळीवेगळी संधी ठरणार आहे.

चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून शिक्षण आणि व्यक्तिमत्व विकासाचे प्रभावी माध्यम असल्याने अशा उपक्रमांची आवश्यकता अधिक अधोरेखित होते. या पार्श्वभूमीवर जळगावमधील जास्तीत जास्त बालक-पालकांनी या ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सवात सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक संस्थांकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here