प्रबोधन आणि मनोरंजनाचा संगम असलेला बालचित्रपट महोत्सव – पोनि राजेंद्र गुंजाळ

 

जळगाव समाचार | २७ एप्रिल २०२६

अजिंठा फिल्म सोसायटी, बालरंगभूमी परिषद आणि रिफ्लेक्शन फाऊंडेशन संचलित पालकशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाचा शुभारंभ रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या हस्ते उत्साहात झाला. या प्रसंगी डॉ. संजय हांडे, सचिन महाजन, डॉ. वीणा महाजन यांनी गुंजाळ यांचे स्वागत केले. व्यासपीठावर विनीत जोशी, डॉ. श्रद्धा पाटील शुक्ल, डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, डॉ. सुचित्रा लोंढे, किरण सोहळे, डॉ. सचिन कुंभार, कमलाकर रुगे, गणेश देसले, रत्नाकर पाटील, डॉ. विद्या पाटील, शैलेश शिरसाठ, योगेश शुक्ल व विनोद ढगे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनंत पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन शैलेश शिरसाठ आणि आभार प्रदर्शन श्वेता जैन यांनी केले.

महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘रणपती शिवराय स्वारी आग्रा’ या ऐतिहासिक चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी बोलताना चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून संस्कार घडवणारे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांमुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते आणि त्यांना चांगल्या विषयांची ओळख होते, असेही त्यांनी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या आग्र्यातील कैदेतून सुटकेचा रोमहर्षक इतिहास या चित्रपटातून प्रभावीपणे उलगडण्यात आला.

चित्रपटातील प्रसंगांना उपस्थित शेकडो विद्यार्थ्यांनी “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी दाद देत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रा. जयेंद्र लेकुरवाळे यांनी गाणी व खेळांच्या माध्यमातून मुलांना संस्कारक्षम मूल्यांची ओळख करून दिली. या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी कमलाकर रुगे, वर्षा उपाध्ये, पार्थ ठाकर, डॉ. अनिल भोकरे, डॉ. वीणा महाजन, डॉ. विशाखा पाटील, मकरंद डबीर, अनघा गोडबोले, आकाश बाविस्कर, मोहित पाटील, नाना सोनवणे, हर्षल पवार आणि पंकज बारी यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे जळगावच्या सांस्कृतिक क्षेत्रात तसेच बालविकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेल्याची भावना उपस्थित पालक, शिक्षक आणि मान्यवरांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here