जळगाव समाचार | १० जानेवारी २०२५
गेल्या वर्षी बदलापूर येथील एका नामांकित शाळेत काही चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणात शाळेतील शिपाई अक्षय शिंदे याला मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. मात्र, पोलीस चकमकीत अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण अधिकच चर्चेत आले. या घटनेच्या चौकशीत स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) शाळा व्यवस्थापनातील काही पदाधिकाऱ्यांनाही सहआरोपी ठरवत त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले होते. त्यामध्ये शाळेचे सचिव तुषार आपटे यांचाही समावेश होता.
दरम्यान, आता कुळगाव-बदलापूर नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाने तुषार आपटे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर प्रकरणातील सहआरोपी असलेले तुषार आपटे सध्या जामिनावर बाहेर असताना त्यांना नगरसेवक पदाची जबाबदारी देण्यात आल्याने सामाजिक व राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यापूर्वीही अक्षय शिंदे प्रकरणावेळी शाळा व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचे आरोप झाले होते आणि संस्थाचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर भाजपच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी तुषार आपटे यांनी पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मदत केल्याचा दावा करत, त्या योगदानाच्या आधारे त्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, संवेदनशील आणि गंभीर स्वरूपाच्या प्रकरणाशी संबंधित व्यक्तीला राजकीय पद देण्यात आल्याने हा वाद आणखी पेटण्याची शक्यता असून, यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची नेमकी भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

![]()




