जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा; रब्बी पिकांवर संकट गडद

 

जळगाव समाचार | १९ मार्च २०२६

जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे केले आहे. बुधवारी सायंकाळनंतर जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला असून काही ठिकाणी तुरळक गारपिटीचीही नोंद झाली आहे. या वादळी परिस्थितीमुळे वाऱ्याचा वेग वाढून झाडांच्या फांद्या तुटणे, वीजपुरवठा खंडित होणे अशा घटना घडल्या असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार गुरुवारीही जळगावसह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी आणि मका या प्रमुख पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आहे. अनेक शेतकऱ्यांनी काढलेले उत्पादन शेतातच साठवून ठेवले आहे. मात्र अचानक झालेल्या पावसामुळे ही पिके भिजण्याचा धोका निर्माण झाला असून त्याचा थेट परिणाम उत्पादनाच्या गुणवत्तेवर होण्याची शक्यता आहे. विशेषतः हरभरा आणि गव्हाला ओलावा लागल्यास बाजारभावात घट होऊ शकते, अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

याचबरोबर शेतात साठवून ठेवलेल्या जनावरांच्या चाऱ्याचाही दर्जा खालावण्याचा धोका निर्माण झाला आहे. बदलत्या हवामानाचा फळबागांनाही मोठा फटका बसण्याची शक्यता असून कलिंगड पिकावर गारपिटीचा परिणाम होऊन फळांची गुणवत्ता घसरण्याची शक्यता आहे. चिकू पिकात फळगळ वाढू शकते, तर आंबा पिकासाठीही ही परिस्थिती धोकादायक ठरत आहे. जोरदार वाऱ्यामुळे मोहोर आणि लहान फळे गळण्याची शक्यता असल्याने बागायतदार चिंतेत आहेत.

हवामान विभागाच्या माहितीनुसार जळगावसह नाशिक, अहिल्यानगर आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना व परभणी या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली असून या भागांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. राज्यातील इतर भागांत ताशी ३० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून मेघगर्जना आणि विजांसह पावसाची शक्यता असल्याने ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

या अवकाळी पावसामागे मध्य प्रदेश आणि परिसरावर तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यांची प्रणाली कारणीभूत असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. या प्रणालीमुळे विदर्भ, मराठवाडा ते उत्तर कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी मार्च महिन्यातही पूर्वमोसमी पावसाचा प्रभाव वाढताना दिसत आहे.

संभाव्य नुकसानीचा अंदाज घेऊन जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. पिकांचे नुकसान झाल्यास त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी विजांच्या कडकडाटावेळी घराबाहेर पडणे टाळावे, झाडाखाली उभे राहू नये आणि वादळी वाऱ्याच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पुढील दोन ते तीन दिवस राज्यात ढगाळ वातावरण कायम राहून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती काळजी घेण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here