जळगाव समाचार | २७ जानेवारी २०२६
तरुणाईच्या गळ्यातील ताईत ठरलेला लोकप्रिय पार्श्वगायक अरिजीत सिंह याने चित्रपटांसाठी गाणे न गाण्याचा अत्यंत धक्कादायक निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत अरिजीतने यापुढे कोणतेही नवीन पार्श्वगायन स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले. हिंदीसह बंगाली, मराठी, तमिळ आणि इतर अनेक भाषांमध्ये 300 हून अधिक चित्रपटांसाठी गाणी गाणाऱ्या अरिजीतच्या या घोषणेमुळे संगीतप्रेमींमध्ये तीव्र भावनिक प्रतिक्रिया उमटत आहेत.
इंस्टाग्राम व फेसबुकवर मंगळवारी रात्री 8.30 वाजता शेअर केलेल्या पोस्टमध्ये अरिजीत सिंह म्हणतो, “गेल्या अनेक वर्षांत मला अमाप प्रेम देणाऱ्या सर्व श्रोत्यांचा मी मनापासून आभारी आहे. मी यापुढे पार्श्वगायक म्हणून कोणतेही नवीन काम स्वीकारणार नाही. हा प्रवास अद्भुत होता आणि इथेच मी तो थांबवत आहे.” मात्र, पार्श्वगायनातून ब्रेक घेतल्यानंतर पुढील वाटचाल नेमकी कशी असेल, याबाबत त्याने कोणतेही स्पष्ट संकेत दिलेले नाहीत.
अरिजीतच्या या निर्णयानंतर सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया प्रचंड प्रमाणात उमटत आहेत. अनेक चाहत्यांनी अरिजीतने हा निर्णय मागे घ्यावा, अशी भावनिक मागणी केली आहे. तर काहींनी त्याच्या संगीत कारकिर्दीतील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्याच्या निर्णयाचा सन्मान केला आहे. दरम्यान, अरिजीत ‘स्वतंत्र संगीत’ आणि लाईव्ह कॉन्सर्टच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडलेला राहील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
अरिजीत सिंहने 2005 मध्ये ‘फेम गुरुकुल’ या रिअॅलिटी शोमधून आपल्या संगीत कारकिर्दीला सुरुवात केली. 2011 मध्ये ‘मर्डर 2’ चित्रपटातील ‘फिर मोहब्बत’ या गाण्यामुळे त्याला मोठी ओळख मिळाली. ‘तुम ही हो’, ‘बिनते दिल’, ‘केसरिया’ यांसारखी अनेक गाजलेली गाणी त्याच्या नावावर आहेत. दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनी सन्मानित अरिजीतला 2025 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.

![]()




