माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीला शासकीय मान्यता; २२ जुलैला राज्यभर अभिवादन

 

जळगाव समाचार | १५ जुलै २०२६

राज्य शासनाने स्वर्गीय अजितदादा अनंतराव पवार यांच्या जयंतीचा सन २०२६ मधील राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या २२ जुलै २०२६ रोजी राज्यभरातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार असून, यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि ज्येष्ठ नेते तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अजितदादा पवार यांच्या जयंतीला शासकीय मान्यता देण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे केली होती. या मागणीनंतर राज्य शासनाने तातडीने निर्णय घेत सामान्य प्रशासन विभागामार्फत संबंधित परिपत्रक जारी केले.

शासनाच्या परिपत्रकानुसार, २२ जुलै २०२६ रोजी मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्येही त्यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्य शासनाने जारी केलेल्या परिपत्रकात अजितदादा पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत प्रशासनावर ठेवलेली मजबूत पकड, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केलेले प्रयत्न आणि लोककल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी दिलेले योगदान याचा गौरव करण्यात आला आहे. जनतेमध्ये ‘दादा’ म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

या निर्णयामुळे यापुढे दरवर्षी २२ जुलै रोजी राज्यभर शासकीय स्तरावर स्वर्गीय अजितदादा अनंतराव पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात येणार असून, त्यांच्या लोकाभिमुख कार्याची आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाची अधिकृतपणे आठवण ठेवली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here