दिग्गज गायिका व ज्येष्ठ अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचे निधन

जळगाव समाचार | ७ नोव्हेंबर २०२५

दिग्गज गायिका आणि ७० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ७१व्या वर्षी गुरुवारी रात्री नानावटी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही काळापासून त्या आजारी होत्या. संगीतकार ललित पंडित यांनी बहिणीच्या निधनाची अधिकृत पुष्टी केली असून, ७ नोव्हेंबर रोजी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असून चाहते सोशल मीडियावर भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करत आहेत.

सुलक्षणा पंडित यांनी १९७५ मध्ये ‘उलझन’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आणि ‘संकोच’, ‘हेरा फेरी’, ‘अपनपन’, ‘खानदान’, ‘धरम कांटा’, ‘वक्त की दीवार’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून प्रभावी भूमिका साकारल्या. अभिनयाबरोबरच त्यांनी १९७० च्या दशकात उत्तम गायिका म्हणूनही आपली ओळख निर्माण केली होती. संगीतकार जतिन-ललित आणि अभिनेत्री विजयता पंडित या त्यांच्या बहिणी असून पंडित कुटुंबातील त्या एक महत्त्वाचा कलावंत होत्या.

गायिका म्हणून त्यांनी लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार, येसुदास यांसारख्या महान गायकांसह अनेक संस्मरणीय गाणी रेकॉर्ड केली. ‘सात समुंदर पार से’, तसेच हिंदी, बंगाली, मराठी, उडिया आणि गुजराती भाषेतील गीतांनी त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली. १९८६ मध्ये रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये त्यांनी केलेलं सादरीकरण विशेष ठरलं. ‘खामोशी : द म्युझिकल’ मधील ‘सागर किनारे भी दो दिल’ या गाण्यासाठी रेकॉर्ड केलेला आलाप हा त्यांच्या करिअरमधील शेवटचा संगीतयोग ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here