जळगाव समाचार | १५ सप्टेंबर २०२६
नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप अकाउंट तयार करून नागरिकांशी संपर्क साधण्याचा प्रकार समोर आल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे नाव, छायाचित्र आणि पदाचा गैरवापर करत थायलंडमधील +66 92 455 6074 या क्रमांकावरून संदेश पाठविले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे, संबंधित व्हॉट्सॲप अकाउंटवर ‘Business Account’ असा उल्लेख असून, त्यावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे नाव व छायाचित्र वापरण्यात आले आहे.
या बनावट अकाउंटवरून काही व्यक्तींना “Hello… How are you doing… Where are you at the moment?” अशा स्वरूपाचे संदेश पाठवून संवाद सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती आहे. या संपर्कामागे नेमका उद्देश काय आहे, तसेच अकाउंट कोणी तयार केले याचा अद्याप उलगडा झालेला नाही. मात्र, बनावट ओळख निर्माण करून नागरिकांशी संपर्क साधला जात असल्याने सायबर फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, नागरिकांनी या परदेशी क्रमांकावरून येणाऱ्या संदेशांना अथवा फोनला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. कोणतीही वैयक्तिक माहिती, महत्त्वाची कागदपत्रे, ओटीपी, बँक खात्याची माहिती किंवा आर्थिक व्यवहारासंबंधी तपशील अनोळखी व्यक्तींना देऊ नये. संशयास्पद संदेश किंवा संपर्क आल्यास त्याकडे दुर्लक्ष करून संबंधित यंत्रणेला माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. या बनावट अकाउंटच्या तपासातून पुढील काळात अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
![]()






