जळगाव समाचार | १८ मार्च २०२६
अमळनेर येथे भरदिवसा व्यापाऱ्यावर मिरची पावडर फेकून साडेपाच लाखांहून अधिक रकमेची लूट करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) यश आले असून, धुळे येथील एका सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून फरार असलेल्या इतर दोन साथीदारांचा शोध पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे.
ही घटना २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे १०.५५ वाजता अमळनेर शहरातील पिंपळे रोड परिसरात घडली होती. ‘लामा जिनिंग’चे मालक यतिन विनोद कोठारी (वय ४८) हे त्यांच्या अॅक्टिवा (क्रमांक MH-19-BC-1465) दुचाकीवरून ५ लाख २७ हजार २०० रुपयांची रोख रक्कम आणि जेवणाचा डबा ग्रे रंगाच्या रेक्झीन बॅगमध्ये घेऊन जिनिंगकडे जात असताना तीन अज्ञात इसमांनी मोटारसायकलवरून येत त्यांना अडवले. आरोपींनी कोठारी यांचा चष्मा हिसकावून त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली आणि त्यांच्या पायाजवळ ठेवलेली रोख रकमेची बॅग बळजबरीने हिसकावून तेथून पसार झाले. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०९ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपासाची दिशा निश्चित केली. या तपासातून धुळे जिल्ह्यातील मनोज खुशाल ऊर्फ अशोक मोकळ (वय २६, रा. दंडेवाला नगर, मोहाडी, जि. धुळे) याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून लुटीतील सुमारे दीड लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.
अटक करण्यात आलेला मनोज मोकळ हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. मार्च २०२१ मध्ये जळगाव शहरातील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात त्याने पिस्तुलाचा धाक दाखवून दोन साथीदारांसह तब्बल १५ लाख रुपयांची बॅग लुटल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल होता. त्या प्रकरणातही जळगाव स्थानिक गुन्हे शाखेनेच त्याला अटक केली होती.
दरम्यान, या गुन्ह्याचा पुढील तपास अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज करीत असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या यशस्वी कारवाईसाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांच्यासह पोलीस कर्मचारी संदीप रमेश पाटील, हरिलाल लक्ष्मण पाटील, प्रविण जनार्दन मांडोळे, राहुल नथु कोळी, दिपक ज्ञानदेव चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच तांत्रिक विश्लेषणासाठी गौरव भगवान पाटील व मिलींद सिताराम जाधव यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.

![]()




