जळगाव समाचार | ६ मार्च २०२६
राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी महत्त्वाचा निर्णय घेत तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती जाहीर केली आहे. त्याचवेळी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल असलेले शिव प्रताप शुक्ला यांची तेलंगणाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनातून ही घोषणा करण्यात आली असून महाराष्ट्रासारख्या देशातील महत्त्वाच्या आणि आर्थिकदृष्ट्या प्रभावी राज्यात जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. ईशान्य भारतातील अनुभवी आणि प्रभावी राजकारणी म्हणून त्यांची ओळख असून त्यांनी त्रिपुरा राज्याच्या राजकारणात दीर्घकाळ महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित असलेले जिष्णू देव वर्मा हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १९५७ रोजी त्रिपुराची राजधानी अगरतळा येथे झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश करत १९९० च्या दशकात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि सक्रिय राजकारण सुरू केले. त्रिपुरामध्ये डाव्या पक्षांचे वर्चस्व असतानाही भाजपची संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले. १९९६, १९९८ आणि १९९९ या काळात त्यांनी त्रिपुरा ईस्ट लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत राष्ट्रीय राजकारणात आपली उपस्थिती दर्शवली.
२०१८ मध्ये त्रिपुरामध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर जिष्णू देव वर्मा यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. २०१८ ते २०२३ या कालावधीत त्यांनी त्रिपुराचे उपमुख्यमंत्री म्हणून वित्त, ऊर्जा, नियोजन, पंचायत राज आणि ग्रामीण विकास यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची धुरा सांभाळली. या काळात आर्थिक नियोजन, ग्रामीण पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रातील सुधारणा यावर त्यांनी विशेष भर दिला. राजकारणाबरोबरच साहित्य, कला आणि क्रीडा क्षेत्रातही त्यांची आवड असून ते कवी आणि लेखक म्हणून ओळखले जातात. तसेच बॅडमिंटन खेळाशीही त्यांचा जवळचा संबंध असून क्रीडा संघटनांमध्ये त्यांनी नेतृत्वाची भूमिका बजावली आहे.

![]()




