जळगावात अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी अजित पवार गटात खळबळ; महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांचा राजीनामा

 

जळगाव समाचार | ३० डिसेंबर २०२५

जळगाव महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये अंतर्गत कलह उफाळून आला आहे. पक्षाचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महायुतीत जागावाटपावरून आधीपासूनच अस्वस्थता असताना, भाजप व शिवसेनेकडून अपेक्षेपेक्षा कमी जागा देण्याची तयारी असल्याने अजित पवार गटात नाराजीचे वातावरण होते.

दरम्यान, तिकीट वाटपाच्या मुद्द्यावरून अभिषेक पाटील यांचा गुलाबराव देवकर व संजय पवार यांच्याशी वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. या वादानंतर पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आपला राजीनामा पाठविल्याचे समजते. महायुतीबाबत परवा रात्रीपासून चर्चा सुरू असली तरी त्या चर्चांना ठोस दिशा मिळाली नव्हती, अशातच हा राजीनामा पक्षासाठी धक्कादायक मानला जात आहे.

या प्रकरणी पत्रकारांनी संपर्क साधला असता अभिषेक पाटील यांनी राजीनाम्याला दुजोरा दिला, मात्र यावर सध्या काहीही बोलण्यास नकार दिला. त्यांच्या राजीनाम्याची नेमकी कारणे काय, याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले असून, राष्ट्रवादी अजित पवार गटातील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उघड झाला असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here