जळगाव समाचार | २८ नोव्हेंबर २०२६
“नेतृत्व म्हणजे लोकांच्या वर उभे राहणे नव्हे, तर त्यांच्यासोबत उभे राहणे होय. आपले यश पदावर न मोजता, शहर योग्य दिशेने जात असल्याच्या समाधानाने नागरिकांच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या हसण्यात मोजले जाते,” असे ठाम प्रतिपादन जळगावच्या महापौर दीपमाला मनोज काळे यांनी केले. मुंबई येथे आयोजित ‘थर्ड वर्ल्ड मेयर फोरम’ आणि ‘चौथ्या महिला नेतृत्व कार्यशाळेत’ त्या बोलत होत्या. या जागतिक व्यासपीठावरून त्यांनी मांडलेल्या जळगावच्या विकासात्मक दृष्टिकोनाचे देश-विदेशातील मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
‘केळीचे शहर’ आणि महापौरपदाची जबाबदारी
आपल्या भाषणात महापौर काळे यांनी जळगावची ओळख करून देताना, भारताचे ‘केळीचे शहर’ आणि देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याशी जोडलेली ही भूमी असल्याचा अभिमान व्यक्त केला. महापौरपद हे केवळ मानाचे पद नसून, शहरातील प्रत्येक नागरिकाप्रती असलेली मोठी जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आयुक्त व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी मोकळा संवाद, परस्पर आदर आणि सांघिक भावनेतून शहराच्या विकासाचे उद्दिष्ट साध्य करता येते, असेही त्या म्हणाल्या.
महिला शहरी परिवर्तनाच्या सूत्रधार
महिला महापौर म्हणून काम करताना विश्वासार्हता सिद्ध करण्यासाठी आणि कठीण निर्णय घेताना अधिक परिश्रम घ्यावे लागतात. मात्र, नेतृत्व हे धाडस आणि बांधिलकीवर आधारित असते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्वच्छता, आरोग्य, पाणी, सुरक्षितता आणि पर्यावरण या बाबी महिला जवळून समजून घेतात. त्यामुळे महिलांकडे केवळ लाभार्थी म्हणून न पाहता शहरी परिवर्तनाच्या सूत्रधार म्हणून पाहिले जावे, असे मत त्यांनी मांडले.
जागतिक नेटवर्क आणि तरुणींना संदेश
विविध देशांतील महिला महापौरांनी एकत्र येऊन यशस्वी कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी एक मजबूत जागतिक नेटवर्क उभारावे, असे आवाहन महापौर काळे यांनी केले. तसेच, नेतृत्वाचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणींनी संधीची वाट न पाहता स्वतःला सक्षम करावे आणि इतरांसाठीही संधीची दारे खुली करावीत, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
स्वच्छ, हरित आणि ‘फ्युचर-रेडी’ जळगावचे स्वप्न
जळगाव हे स्वच्छ, हरित, सुरक्षित आणि सर्वसमावेशक शहर म्हणून नावारूपाला यावे; जिथे तंत्रज्ञान थेट लोकांच्या सेवेत असेल आणि विकास समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल, असे ‘फ्युचर-रेडी’ व्हिजन त्यांनी या परिषदेत मांडले. ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’चा नारा देत त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

![]()







