बोरनारमध्ये लग्नसमारंभात रक्तरंजित थरार; चाकूहल्ल्यात २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू एमआयडीसी पोलिसांकडून तपास सुरू, एक संशयित ताब्यात


जळगाव समाचार | १९ नोव्हेंबर २०२६

गावातील लग्नसोहळा सुरू असतानाच झालेल्या वादाचे पर्यवसान थेट हत्येत झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील बोरनार येथे बुधवारी (१८ नोव्हेंबर) सायंकाळी घडली. प्रेम गोपाल धनगर (वय २३, मूळ रा. बोरनार, सध्या रा. अमळनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे. लग्नसमारंभात झालेल्या वादातून अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेने गावात खळबळ उडाली असून धनगर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

प्रेम हा अमळनेर येथे वास्तव्यास होता. त्याचे आई-वडील बोरनार येथे राहत असल्याने दोन दिवसांपूर्वी तो गावी आला होता. बुधवारी सायंकाळी गावातील एका विवाह सोहळ्याला उपस्थित असताना त्याचा काही व्यक्तींशी वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झालेल्या या प्रकाराचे पुढे हाणामारीत रूपांतर झाले. याचदरम्यान एका हल्लेखोराने प्रेम याच्यावर चाकूने वार केले. गंभीर जखमा झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक बोरनार येथे दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान, प्रेम धनगर याच्याविरुद्ध यापूर्वी काही गुन्हे दाखल असल्याची माहितीही समोर येत आहे. मात्र, हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. वादाचे नेमके कारण, हल्ल्यातील अन्य व्यक्तींचा सहभाग आणि हत्येमागील पार्श्वभूमी यांचा पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, तरुणाच्या मृत्यूची वार्ता समजताच कुटुंबीय व नातेवाईकांनी रुग्णालयात आक्रोश केला. लग्नसोहळ्यात घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे बोरनार परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here