जळगाव समाचार | १८ नोव्हेंबर २०२६
हौशी रंगकर्मींच्या अभिनयकौशल्याला हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेची जळगाव केंद्रावरील प्राथमिक फेरी येत्या २२ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित या स्पर्धेत जळगाव, नंदुरबार आणि इंदूर येथील एकूण १५ नाट्यसंस्था सहभागी होणार आहेत. मूळजी जेठा महाविद्यालय परिसरातील महाकवी कालिदास सभागृहात दररोज सायंकाळी ७ वाजता नाट्यप्रयोग सादर केले जाणार आहेत. त्यामुळे आगामी काळात जळगावकरांना विविध विषयांवरील नाटकांचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे. राज्यातील हौशी नाट्यचळवळीला प्रोत्साहन देणे, नव्या कलाकारांना संधी उपलब्ध करून देणे आणि मराठी रंगभूमीची परंपरा पुढे नेणे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या नियोजनानुसार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विविध विषय आणि नाट्यप्रकारांचा समावेश असल्याने यंदाच्या फेरीत कलाकारांना आपली सर्जनशीलता दाखविण्याची संधी मिळणार आहे. सहभागी संस्थांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले असून, प्रत्येक संस्था आपले सादरीकरण प्रभावी करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
महाकवी कालिदास सभागृह, मनभावन इमारत, मूळजी जेठा महाविद्यालय परिसर, एकलव्य क्रीडा संकुलासमोर, जळगाव येथे ही स्पर्धा होणार आहे. २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या नाट्यप्रयोगांना जळगावसह परिसरातील रसिकांनी उपस्थित राहावे आणि हौशी कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

![]()







