वाघोड आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांचा कर्तव्यात कसूर ? केंद्राच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांचे गंभीर आरोप…

 

जळगाव समाचार | १२ सप्टेंबर २०२६

रावेर तालुक्यातील वाघोड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थिती आणि कर्तव्याबाबत ग्रामस्थांनी गंभीर तक्रारी केल्या असून, नियमित वेळेत रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळत नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. सकाळी ९ ते दुपारी १२ नंतर रुग्णांना अपेक्षित उपचार उपलब्ध होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून, याबाबत यापूर्वी तक्रारी करूनही संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची प्रत्यक्ष तपासणी करून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीची वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी जिल्हा परिषदेकडे करण्यात आली आहे.

दरम्यान, आरोग्य केंद्रातील एकूण ४० मंजूर कर्मचारी पदांपैकी तब्बल १७ पदे रिक्त असल्याने आरोग्यसेवेवर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद आहे. त्यातच IV सेट, कप सिरप यांसारखे आवश्यक वैद्यकीय साहित्य व औषधांचा तुटवडा असल्याच्या तक्रारीही ग्रामस्थांनी केल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाच्या आरोग्य व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

आरोग्य केंद्राची तुटलेली संरक्षक भिंत, परिसरातील झाडे-झुडपे व कचरा तसेच काही व्यक्तींकडून मद्यपान होत असल्याच्या तक्रारींमुळे केंद्राचा परिसर असुरक्षित बनल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रिक्त पदे तातडीने भरणे, औषधांचा नियमित पुरवठा करणे, डॉक्टर व कर्मचाऱ्यांची उपस्थिती सुनिश्चित करणे, संरक्षक भिंतीची दुरुस्ती आणि परिसराची स्वच्छता करण्याची मागणी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेकडे केली आहे. आता प्रशासन या तक्रारींची दखल घेऊन चौकशी करणार का आणि संबंधित अधिकाऱ्याच्या भूमिकेची वस्तुस्थिती काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here