जळगाव समाचार | १० सप्टेंबर २०२६
पारोळा तालुक्यात बैलाला धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान अठरा वर्षीय तरुणाच्या निर्घृण हत्येत झाल्याची धक्कादायक घटना पारोळा तालुक्यातील पळासखेडे बु. गजानन येथे बुधवारी (१० सप्टेंबर) दुपारी तीन ते चार वाजेच्या सुमारास घडली. मयूर बाळू उर्फ दुर्वास पाटील (वय १८) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेनंतर संशयित आरोपी फरार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पळासखेडे बु. गजानन येथे बैलपोळ्यानिमित्त पोळा फोडण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्त शेतकरी बैलांना घेऊन राजवड रस्त्यावरील रवींद्र सुखदेव शिंदे यांच्या शेताजवळ असलेल्या पानदेव महाराज मंदिरात दर्शनासाठी जात होते. दर्शन आटोपून बाळू उर्फ दुर्वास भिका पाटील (वय ४५) आणि त्यांचा मुलगा मयूर गावाकडे परतत असताना समोरून येणाऱ्या बैलांपैकी अंकुश नेहरू पाटील यांच्या बैलाची मयूरच्या बैलाला धडक झाली. याच कारणावरून वाद निर्माण झाला.
या वादातून अंकुश नेहरू पाटील, नेहरू परभत पाटील आणि शुभम शालिक पाटील यांनी मयूरसोबत वाद घातल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर त्याच्यावर धारदार चाकूने हल्ला करण्यात आला. पोटात चाकूचा वार झाल्याने मयूर गंभीर जखमी झाला. ग्रामस्थांनी तातडीने त्याला दुचाकीवरून पारोळा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला रुग्णवाहिकेने जळगावकडे हलविण्यात आले. दरम्यान, एरंडोल शहराजवळ त्याची प्राणज्योत मालवली.
घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून, संशयित आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, घटनेनंतर ग्रामस्थांनी पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठी गर्दी केली होती. वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच भोज फाटा परिसरातील अधिकारी घटनास्थळी दाखल होणार असल्याची माहिती मिळाली. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
![]()






