जळगाव जिल्ह्यात पाच महिन्यात FDAचा कारवाईचा धडाका; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सहा दुकानांचे परवाने निलंबित तर गुटख्याविरोधी कारवाईतही ३४ जणांना अटक…

 

जळगाव समाचार | १० सप्टेंबर २०२६

जिल्ह्यात अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तसेच अस्वच्छ पद्धतीने खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) गेल्या पाच महिन्यांत धडक कारवाई केली आहे. एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत जिल्हाभरात करण्यात आलेल्या तपासण्या, छापे आणि नमुना तपासणीत अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत.

जिल्ह्यात सध्या २ हजार १३९ परवानाधारक आणि २७ हजार ६३१ नोंदणीधारक अन्न व्यावसायिक आहेत. या कालावधीत प्रशासनाकडून ६०३ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन आढळलेल्या सहा आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

२१ अन्न नमुने अप्रमाणित

प्रयोगशाळेच्या तपासणीसाठी जिल्ह्यातून ४०७ अन्न नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत ६६ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून, ४२ नमुने निर्धारित निकषांनुसार प्रमाणित तर २१ नमुने अप्रमाणित आढळले आहेत. या नमुन्यांमध्ये दूध, पनीर, खाद्यपदार्थ तसेच शीतपेयांचा समावेश आहे.

दरम्यान, भुसावळ येथील एका परवानाधारक व्यावसायिकाच्या पनीरचा नमुना ‘अनसेफ’ असल्याचा प्रयोगशाळा अहवाल आला आहे. संबंधित व्यावसायिकाने या अहवालाला कायदेशीर प्रक्रियेद्वारे आव्हान दिले आहे.

१३६ व्यावसायिकांवर दंड

तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन आणि अस्वच्छता आढळलेल्या १३६ छोट्या व्यावसायिकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण ८ लाख ५८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, संबंधितांना त्रुटी दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

४७ ठिकाणी छापे; २४ लाखांचा संशयास्पद साठा जप्त

FDAच्या पथकांनी जिल्ह्यातील ४७ ठिकाणी छापे टाकून तब्बल २३ लाख ९८ हजार ५५३ रुपयांचा संशयास्पद खाद्यसाठा जप्त केला. यात खुले खाद्यतेल, दूध, खवा, शीतपेये आणि पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरचा समावेश असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

गुटखा तस्करीविरोधातही मोठी कारवाई

बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधातही प्रशासनाने कारवाईची मोहीम राबवली. या कालावधीत ३४ कारवाया करण्यात आल्या. त्यात ६७ लाख ३१ हजार ५९२ रुपयांचा गुटखा व अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत ३४ जणांना अटक करण्यात आली असून, गुटख्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ८ वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. या वाहनांची एकूण किंमत सुमारे ३६ लाख २० हजार रुपये असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत तडजोड करणाऱ्या आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील खाद्य व्यवसायांवरील तपासणी आणि गुटखाविरोधातील कारवाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here