जळगाव समाचार | २१ ऑगस्ट २०२६
नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे नेते गिरीश महाजन यांचे जळगावात प्रथम आगमन होताच भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांकडून उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. जळगाव रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. महाजन यांच्या आगमनावेळी घोषणाबाजी, पुष्पवृष्टी आणि जल्लोषामुळे परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांनी गिरीश महाजन यांना भव्य गुलाबहार घालून त्यांचे अभिनंदन केले. तसेच उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देत शुभेच्छा व्यक्त केल्या. स्वागत कार्यक्रमास भाजप पश्चिम महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, भाजप गटनेते प्रकाश बालाणी, नगरसेवक ॲड. शुचिता हाडा, अरविंद देशमुख, सुरेखा तायडे, गायत्री राणे, विशाल भोळे, राजेंद्र घुगे पाटील तसेच महानगर सचिव विशाल त्रिपाठी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गिरीश महाजन यांच्यावर नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे यावेळी दिसून आले. रेल्वे स्थानक परिसरात समर्थकांकडून विविध घोषणा देण्यात आल्या. महाजन यांच्या स्वागतासाठी झालेली मोठी गर्दी, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि आयोजित सत्कार कार्यक्रमामुळे त्यांचे जळगावातील आगमन विशेष ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले.

![]()




