हतनूर धरणातून विसर्गात मोठी वाढ; तापी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

 

जळगाव समाचार | ३१ जुलै २०२६

हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे तापी नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन जळगाव पाटबंधारे विभाग आणि जिल्हा प्रशासनाने केले आहे.

शुक्रवारी (दि. 31) सकाळपर्यंतच्या प्राप्त माहितीनुसार, हतनूर धरणाच्या एकूण 41 दरवाजांपैकी 4 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले असून 32 दरवाजे 2 मीटरपर्यंत उघडले आहेत. सध्या धरणातून तापी नदीपात्रात 1,85,828 क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

दरम्यान, धरण क्षेत्रातील पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील काही तासांत हा विसर्ग 3.50 लाख ते 3.75 लाख क्युसेक्स इतका वाढण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

तापी नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांनी नदीपात्रात किंवा पुराच्या पाण्याजवळ जाणे टाळावे, जनावरे व शेतीसंबंधी साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here