जळगाव समाचार | २५ जुलै २०२६
आषाढी एकादशीच्या निमित्ताने जळगावातील अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल (प्रायमरी) व अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल (सेकंडरी) येथे दिंडी सोहळा, पालखी आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडीत सहभागी होत वारकरी परंपरेचा अनुभव घेतला.
यावेळी विद्यार्थ्यांनी “पंढरीचा पांडुरंग विटेवर का उभा आहे?” या विषयावर आधारित नाटिका सादर करून वारकरी संप्रदायाचा इतिहास, संतपरंपरा आणि विठ्ठलभक्तीचा संदेश प्रभावीपणे मांडला. शाळेच्या प्राचार्या रेश्मी लाहोटी यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना पालखी, दिंडी आणि वारीचे सांस्कृतिक व आध्यात्मिक महत्त्व समजावून सांगण्यात आले.
यंदाच्या दिंडीचे विशेष आकर्षण म्हणजे “झाडे लावा, झाडे जगवा” हा पर्यावरण संवर्धनाचा संदेश. विद्यार्थ्यांनी घोषणांद्वारे हरित पर्यावरणाचा जागर केला आणि भक्तीसोबतच पर्यावरण संरक्षणाची जबाबदारीही प्रत्येकाने स्वीकारावी, असे आवाहन केले.
संचालिका निशा जैन व प्राचार्या रेश्मी लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर सोनवणे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. वैशाली दुसाने यांनी नाटिका साकारली, तर जयश्री कासार यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठलनामाच्या अखंड गजराने संपूर्ण शाळा परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.

![]()





